अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे- मनमोहन सिंग
By admin | Published: January 21, 2017 05:11 AM2017-01-21T05:11:26+5:302017-01-21T05:11:26+5:30
भारतीय विद्यापीठांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्यावर आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर धोक्याचे ढग दिसत आहेत
कोलकाता : भारतीय विद्यापीठांमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्यावर आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर धोक्याचे ढग दिसत आहेत, असे स्पष्ट करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ आणि जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीवर गदा आणण्याचा प्रयत्न झाला. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हा प्रयत्न लोकशाहीविरोधी असून, शांततापूर्ण विरोध दडपण्याचा आणि शिक्षणाच्या दृष्टीने बाधक असल्याचे परखड मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या द्विशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते.
विद्यार्थी, नागरिकांना विचार करण्याची आणि खुलेपणाने विरोध व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळते, तोच खरा राष्ट्रवाद होय. विधायक संवादातून हे साध्य होते. या मार्गानेच आपण लोकशाही अधिक भक्कम आणि व्यापक करू शकतो. या वेळी त्यांनी हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्या प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.
विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थेतील नियुक्तीतील राजकीय ढवळाढवळ म्हणजे अदूरदर्शीपणा होय. विद्यापीठांची स्वायत्तता शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. तसेच अभिव्यक्ती हक्काप्रति विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. आवश्यक ती माहिती प्राप्त करण्याचे स्वातंत्र्यही विद्यापीठांनी दिले पाहिजे. (वृत्तसंस्था)