लाच मागणाऱ्या मंत्र्याची केजरीवालांकडून हकालपट्टी

By admin | Published: October 10, 2015 05:46 AM2015-10-10T05:46:11+5:302015-10-10T05:46:11+5:30

एका बिल्डरकडून कथितरीत्या ६ लाख रुपयांची लाच मागणारे दिल्ली सरकारमधील पर्यावरण तसेच अन्न व पुरवठा मंत्री असिम अहमद खान यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Expulsion from Kejriwal to seek bribe | लाच मागणाऱ्या मंत्र्याची केजरीवालांकडून हकालपट्टी

लाच मागणाऱ्या मंत्र्याची केजरीवालांकडून हकालपट्टी

Next

नवी दिल्ली : एका बिल्डरकडून कथितरीत्या ६ लाख रुपयांची लाच मागणारे दिल्ली सरकारमधील पर्यावरण तसेच अन्न व पुरवठा मंत्री असिम अहमद खान यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी तडकाफडकी मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीची शिफारसही करण्यात आली. खान यांच्या जागी केजरीवाल मंत्रिमंडळात जुन्या दिल्लीच्या बल्लीमारनचे आमदार इमरान हुसैन यांची वर्णी लागली आहे.
खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रपरिषदेत अहमद खान यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर केले. एका आॅडीओ क्लिपची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. अहमद खान यांच्याविरुद्ध गुरुवारी तक्रार मिळाली. तक्रारकर्त्याने अहमद खान आणि संबंधित बिल्डर यांच्या एक तासाच्या संभाषणाची टेप सरकारला दिली. यानंतर अंतर्गत चौकशीअंती २४ तासांच्या आत कारवाई करीत, अहमद खान यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला,असे सांगत आप सरकार भ्रष्टाचार कदापि खपवून घेणार नाही, असे केजरीवाल म्हणाले. ही मीडियाच्या खुलाशानंतर केलेली कारवाई नाही तर केजरीवाल सरकारच्या ध्येयधोरणानुसार केलेली कारवाई आहे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. पहिल्यांदा आमदार झालेले इमरान हुसैन हे आपल्या मंत्रिमंडळातील नवा चेहरा असतील, असेही त्यांनी सांगितले.
खान यांच्या विधानसभा मतदारसंघात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. खान यांनी या बांधकामास विरोध केला होता. बांधकाम सुरू करायचे तर त्यासाठी सहा लाखांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली होती. बिल्डरनेही मागणीनुसार सहा लाख रुपये दिले होते. त्यानंतर इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरू झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांनी संबंधित आॅडिओ टेप खरी असल्याचे खुद्द केजरीवालांसमक्ष कबूल केले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी जूनमध्ये केजरीवाल सरकारने तत्कालीन कायदामंत्री जितेन्द्रसिंह तोमर यांची बनावट पदवी प्रकरणानंतर हकालपट्टी केली होती.

आम आदमी पार्टी व आमचे सरकार कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेत नाही. खान यांच्याविरोधात २४ तासांत कारवाई केली गेली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे यांना हटविण्याचे धैर्य भाजपाने दाखवावे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

केजरीवाल कधी नजीब जंग यांच्याशी लढतात, कधी मोदींशी तर कधी राजनाथसिंह यांच्याशी लढतात. आता त्यांना आपल्याच लोकांशी लढावे लागतेय. त्यांच्या लढाईची कहाणी त्यांच्यावर सोडून देऊ. दिल्लीचे उत्तर मात्र आम्ही त्यांना दिल्लीतच देऊ.
- रविशंकर प्रसाद, भाजपा

केजरीवाल सरकारमधील एका मंत्र्याची हकालपट्टी हा केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. माध्यमांना आकर्षिक करण्यासाठी हा सर्व ‘तमाशा’ सुरू आहे.
- शीला दीक्षित, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री

आठ महिन्यांपेक्षा कमी काळात आम आदमी पार्टीचे एक तृतीयांश मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. शिवाय या सरकारच्या लोकपालचे काय झाले?
-अजय माकन, काँग्रेस नेते

 

Web Title: Expulsion from Kejriwal to seek bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.