लोकसभा अधिवेशनाला मुदतवाढ म्हणजे हुकूमशाही
By Admin | Published: May 9, 2015 12:09 AM2015-05-09T00:09:03+5:302015-05-09T05:31:40+5:30
लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाळ आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत समस्त विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला
नवी दिल्ली : लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाळ आणखी तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या निर्णयाचा जोरदार विरोध करीत समस्त विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. हा निर्णय ‘हुकूमशाही’ प्रवृत्तीचा असल्याचे विरोधक म्हणाले, तर संसदेऐवजी मीडियातून याबद्दलची माहिती मिळाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
या आधीच्या परंपरेप्रमाणेच हा निर्णय घेण्यात आला; परंतु राज्यसभेची बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने आणि संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडूंसह अन्य अनेक मंत्री राज्यसभेत व्यग्र असल्याकारणाने काही पक्षांच्या नेत्यांना हा निर्णय कळविता आला नाही, अशी सारवासारव करीत सरकारने विरोधकांची टीका फेटाळली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या सदस्यांनी लोकसभा अधिवेशनाची मुदत वाढविण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. या पक्षांच्या सदस्यांसोबतच अन्य पक्षांचे सदस्यही हौदात गोळा झाले आणि सरकारविरोधी घोषणा देऊ लागले. या गदारोळामुळे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. ‘तानाशाही नही चलेगी’ आणि ‘मोदी सरकार जबाब दो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. निर्णय घेताना आपल्याशी संपर्क साधला गेला नाही, असा विरोधकांचा आक्षेप होता.
लोकसभा अधिवेशनाची मुदत तीन दिवसांसाठी वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयाला कामकाज सल्लागार कमिटीने मंजुरी दिल्यानंतर; लोकसभेची बैठक १३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी जाहीर केले आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करण्याची अनुमती महाजन यांनी विरोधकांना दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)