पुणे, अहमदनगर प्रकल्पांना मुदतवाढ
By admin | Published: May 22, 2015 01:17 AM2015-05-22T01:17:12+5:302015-05-22T01:17:12+5:30
पुणे आणि अहमदनगरसह सात ठिकाणचा नॅशनल आॅटोमोटिव्ह टेस्टिंग अॅण्ड आर अॅण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आता पुढील तीन वर्षांत मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
गेल्या अनेक दशकांपासून ठप्प पडलेला पुणे आणि अहमदनगरसह सात ठिकाणचा नॅशनल आॅटोमोटिव्ह टेस्टिंग अॅण्ड आर अॅण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आता पुढील तीन वर्षांत मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.
विविध ठिकाणी जमिनीचे अधिग्रहण करण्यात झालेला विलंब, मंजुरी मिळविण्यात झालेला विलंब, कंत्राटविषयक अडचणी, विदेशी चलनातील परिवर्तन आणि अन्य समस्यांमुळे एनएटीआरआयपीला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे. आपल्या निम्म्या क्षमतेनिशी कार्यान्वित असलेला पुण्यातील प्रकल्पांचा दर्जा वाढविणे शक्य झाले नाही. परंतु आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कामकाज समितीने पुण्याच्या आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया येथील टेस्टिंग अॅण्ड होमोलोगेशन सुविधा आणि अहमदनगर येथील व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हलप्मेंट एस्टॅब्लिशमेंटचा दर्जा वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पुणे व नगरसह ज्या अन्य ठिकाणी हा प्रकल्प स्थापन केला जाणार आहे, त्यात सिल्चर, रायबरेली, मानेसर, चेन्नई आणि इंदूरचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे म्हणजे ३१ डिसेंबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हा प्रकल्प शिवसेनेचे अनंत गीते यांच्या नेतृत्वातील अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
या प्रकल्पातील सुविधा
१)हरियाणाच्या मानेसर येथील आॅटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या उत्तर हबमध्ये पूर्ण विकसित टेस्टिंग आणि होमोलोगेशन सेंटर.
२)चेन्नईजवळील आॅटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या दक्षिण हबमध्ये पूर्ण विकसित टेस्टिंग व होमोलोगेशन सेंटर.
३) पुणे येथील आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया (अराई)मधील विद्यमान टेस्टिंग आणि होमोलोगेशन सेंटर तसेच अहमदनगरच्या व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हलप्मेंट एस्टॅब्लिशमेंटचा दर्जा वाढविणार.
४) ४००० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे प्रमाणित मैदान.
५)आसामच्या सिल्चर येथील धोलचोरा येथे राष्ट्रीय विशेष हिल ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र.