अॅपल, फेसबुकला नमवणाऱ्या ट्रायच्या अध्यक्षांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:05 AM2018-08-10T10:05:58+5:302018-08-10T10:06:48+5:30
रामसेवक शर्मा 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत ट्रायचे अध्यक्ष राहणार
मुंबई : अॅपल आणि फेसबुकवर कारवाईचे पाऊल उचलणारे ट्रायचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांचा अतिरिक्त कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. आता ते आणखी दोन वर्षे ट्रायचे अध्यक्षपदी राहणार आहेत. शर्मा यांनी इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना ताळ्यावर आणले होते.
रामसेवक शर्मा यांचा कार्यकाळ आज, शुक्रवारी संपणार होता. मात्र, त्या आधीच त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नेट न्युट्रीलिटी हा त्यांचा निर्णय होता. यापूर्वी कंपन्या वेगवेगळ्या वेबसाईट, सेवांच्या वापरासाठी वेगवेगळे दर आकारत होत्या. तर फेसबुकसारख्या कंपन्या मोफत इंटरनेट पुरवत होत्या. नेट न्युट्रीलिटी मुळे याचा जोरदार फटका फेसबुकला बसला.
तसेच त्यांनी स्पॅम मेसेज, मेलचा शोध घेण्यासाठी अॅपल या कंपनीलाही नमवले होते. अॅपल कंपनी आपल्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी नावाजली जाते. ते अमेरिकेलाही ग्राहकाच्या मोबाईलमधील माहिती कोणत्याही कारणास्तव देत नाहीत. अशा कंपनीलाही भारतीय ग्राहकांच्या मोबाईलमध्ये स्पॅम मेसेज आल्यास त्याचा शोध घेण्यासंदर्भातील अॅक्सेस देण्यास बाध्य केले होते.
केंद्र सरकाने गुरुवारी सायंकाळीच रामसेवक शर्मा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आल्याचे सांगितले. यानुसार ते 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत ट्रायच्या अध्यक्षपदावर राहणार आहेत. ते यापूर्वी युआयडीएआयचेही अध्य़क्ष होते.