वाहनचालक परवान्याच्या वैधतेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; केंद्राचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:10 AM2020-12-29T02:10:44+5:302020-12-29T07:00:57+5:30
वाहन व वाहन चालविण्याशी संबंधित ज्या कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत संपणार आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची साथ सुरू आहे. हे लक्षात घेता, वाहनचालक परवाना, वाहननोंदणी प्रमाणपत्र (आरसी), परमीट यांच्या वैधतेस पुढील वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे देशातील लाखो वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे.
वाहन व वाहन चालविण्याशी संबंधित ज्या कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत संपणार आहे, त्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा नवा आदेश लागू होईल. १९८९चा मोटरवाहन कायदा, १९८९चे केंद्रीय मोटरवाहन नियम यांच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या वैधतेला मुदतवाढ देण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यंदा ३० मार्च, ९ जून, २४ ऑगस्ट रोजी सूचना जारी केल्या होत्या. कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करत, असंख्य वाहतूकदार आपली सेवा बजावत असतात.
कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी निर्णय
वाहनाशी संबंधित विविध कागदपत्रांची वैधता संपण्याआधी ती कागदपत्रे नव्याने करण्यासाठी होणारी गर्दी कोरोना साथीच्या काळात टळावी, ही साथ नियंत्रणात राहावी, म्हणून या कागदपत्रांच्या वैधतेला मुदतवाढ देण्यात आली. या आधी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती.