एक्झिट पोलच्या निष्कर्षात व्यापक तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 04:53 AM2019-05-22T04:53:23+5:302019-05-22T04:53:42+5:30
अंदाजात विरोधाभास : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला किमान ३४ जागा मिळण्याचा अंदाज
- हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सर्वच एक्झिट पोलने देशात पुन्हा एनडीएच्या सरकारला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीला ३३ अथवा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील, असे अंदाज व्यक्त केले आहेत; पण बारकाईने पाहिले, तर या निष्कर्षातील विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो.
इंडिया टुडे- अॅक्सिस, टुडेज चाणक्य, न्यूज १८ या तिघांच्या एक्झिट पोलने एनडीएला ३३६ ते ३५० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे; पण त्यांनी केलेले दावे राज्यवार पाहिले, तर त्यातील अस्पष्टता दिसून येते. उदाहरणार्थ, न्यूज १८ ने भाजप- शिवसेनेला ४२-४५ जागा दिल्या आहेत. इंडिया टुडे- अॅक्सिसने चार जागा कमी दिल्या आहेत. टुडेज् चाणक्यने ३८ जागा सांगितल्या आहेत. अन्य एक्झिट पोलचे यावर एकमत आहे की, एनडीएला किमान ३४ जागा मिळतील. एक्झिट पोलने काँग्रेस- राष्ट्रवादीला ४ ते १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
इंडिया टुडे अॅक्सिसच्या प्रदीप गुप्ता यांच्याकडून प्रतिसाद मिळविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. तथापि, ते दूरचित्रवाणी वाहिनीवर त्यांच्या निष्कर्षाची कारणमीमांसा करीत होते. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या न्यूज १८ टीव्ही नेटवर्कसाठी आयपीएसओएसने काम केलेले नव्हते. गंमत म्हणजे राजीव शुक्ला यांचा न्यूज २४ गु्रपदेखील मुकेश अंबानी यांच्या जवळचा समजला जातो. जनमत चाचण्या करणाऱ्या या तिघांना वगळता इतर सात जणांनी रालोआला २७७ ते ३०६ जागा मिळतील, असे म्हटले आहे.
उत्तरप्रदेशबाबत संभ्रम
अत्यंत महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेश राज्यात तीव्र मतभेद समोर आले आहेत. उत्तर प्रदेशात जनमत चाचण्या करणाºया तिघांनी रालोआला लोकसभेच्या ६० ते ६८ जागा दिल्या आहेत; परंतु इतर सात अंदाज वर्तवणाऱ्यांनी रालोआला ३३ ते ५८ जागा दिल्या आहेत.
ओदिशा राज्यातील कल सांगताना या तीन जनमत चाचण्यांचे अंदाज सांगणाºयांतील मतभेद खूपच स्पष्ट झाले. टुडेज चाणक्यने जर आज १४ जागा भाजपला ओदिशात दिल्या, तर इंडिया टुडे अॅक्सिसने तेथेच भाजपला शून्य जागा दिल्या, तर न्यूज एटीनने भाजपला ६ ते ८ जागा दिल्या.