कृषी, ग्रामीण पर्यटनाचे व्यापक धोरण अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:36 AM2020-01-01T04:36:50+5:302020-01-01T04:37:03+5:30
राज्यात कृषी व ग्रामीण पर्यटनाचा ट्रेंड वाढतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे येथील टूर ऑपरेटर्सचे लक्ष या व्यवसायाने वेधून घेतले आहे.
- राकेश कदम
राज्यात कृषी व ग्रामीण पर्यटनाचा ट्रेंड वाढतोय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे येथील टूर ऑपरेटर्सचे लक्ष या व्यवसायाने वेधून घेतले आहे. कृषी पर्यटन व्यवसायात अनेक वर्षांपासून विकसित होतोय. मावळत्या वर्षात जवळपास ५० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली असेल, असे राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भातील धोरणाचा मसुदा तयार असून, नव्या वर्षात कृषी व ग्रामीण पर्यटनाचे व्यापक धोरण अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
लोकांना आता नैसर्गिक पद्धतीचे भोजन, अधिवास हवा आहे. कौलारू घर, गावाकडचे जेवण, पर्यटन केंद्रावर ग्रामीण वातावरण, अशी व्यवस्था हवी आहे. टूरिझम आॅपरेटर यांच्याकडूनही काही सल्ले मिळत आहेत. त्या दृष्टीने आम्ही २०२० मध्ये पुणे व मुंबईतील टूर आॅपरेटर आणि कृषी पर्यटन केंद्रचालक यांची एक महापरिषद घेणार आहोत. यात दोघांनाही प्रशिक्षण दिले जाईल. कृषी व ग्रामीण पर्यटनासाठी राज्य सरकारने विशेष धोरण जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे. त्याचा मसुदाही तयार आहे.
हे धोरण २०२० सालात यावे, यासाठी प्रयत्न राहील. सोलापुरातील रत्नाई शिवारचे सिद्धाराम गुंगे म्हणाले, लोकांचा लुप्त होत चाललेला ग्रामीण जीवनातील रस वाढतोय. राज्यात ५०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्रे असतील. नव्या वर्षात आणखी बरीच निर्माण होतील. पर्यटन केंद्रांवर चांगल्या सुविधा मिळाव्यात, जुन्यातील जुन्या गोष्टी पाहायला मिळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.