15 वर्षांनी संपणार भाजपाचा वनवास, उत्तरप्रदेशात सत्ता मिळण्याचा सर्व्हेचा अंदाज
By admin | Published: January 5, 2017 09:36 AM2017-01-05T09:36:34+5:302017-01-05T09:48:05+5:30
इंडिया टुडे - अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार राजकारणात अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणा-या उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 5 - उत्तरप्रदेशासहित पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. सर्व राज्यांमधील निवडणुका महत्वाच्या असल्या तरी सर्वांचं लक्ष लागून आहे ते उत्तरप्रदेशाकडे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार गेल्या 15 वर्षांपासून भाजपाचा सुरु असलेला वनवास यावेळी संपण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे - अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार राजकारणात अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणा-या उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. भाजपाच्या खात्यात 206 ते 216 जागा जमा होण्याची शक्यता आहे. एकूण मतदारांपैकी एक तृतीयांश मतदारांचं समर्थनही मिळू शकतं.उत्तरप्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 मार्चला निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.
इंडिया टुडे - अॅक्सिसचा हा सर्व्हे 12 ते 24 डिसेंबर दरम्यान करण्यात आला. सर्व्हेनुसार एकीकडे भाजपाला 206 ते 216 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तिकडे दुसरीकडे समाजवादी पक्ष दुस-या स्थानावर आहे. कौटुंबिक वादात अडकलेल्या समाजवादी पक्षआला 92 ते 97 जागा मिळू शकतात. बहुजन समाज पक्षाला 79 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला दोन अंकी आकडाही पार करणं कठीण होणार आहे. काँग्रेसच्या खात्यात पाच ते नऊ जागा जमा होऊ शकतात. मतदानाच्या टक्क्यांबद्दल बोलायला गेल्यास सर्व्हेनुसार भाजपाला 33 टक्के, बसपा आणि सपाला 26-26 टक्के, काँग्रेसला सहा टक्के आणि इतरांनी नऊ टक्के मतं मिळू शकतात.
कोण होणार आदर्श मुख्यमंत्री -
सर्व्हेत सहभागी होणा-या अनेकांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. 33 टक्के लोक अखिलेश यादव चांगले मुख्यमंत्री असल्याचं बोलले आहेत. 25 टक्के लोकांनी मायावतींना, 22 टक्के लोकांनी राजनाथ सिंह तर 18 टक्के लोकांनी आदित्यनाथ चांगले मंत्री असल्याचं सांगितलं आहे. सर्व्हेनुसार प्रियंका गांधी, मुलायम सिंह यादव आणि वरुण गांधी यांना मुख्यमंत्रीपदासाठी फक्त एक टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर लोकांची मायावतींना पसंती आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या 48 टक्के लोकांनी मायावती कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत उत्तम असल्याचं सांगितलं. तर 28 टक्के लोकांनी अखिलेश आणि 23 टक्के लोकांनी राजनाथ सिंह यांना पसंती दर्शवली आहे. फक्त एक टक्का लोकांनी मुलायम सिंह यांना पसंती दाखवली.
भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा ?
भाजपाने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा का ? या प्रश्नावर जास्तीत जास्त लोकांचं हो असंच उत्तर आहे. 69 टक्के लोकांनी भाजपाने उमेदवार जाहीर करावा असं वाटत आहे. तर 24 टक्के लोक भाजपाने असं करु नये सांगत आहेत.
सर्वात मोठा निवडणूक मुद्दा -
या निवडणुकीत विकासाचा मुद्दा मुख्य मुद्दा असेल असं 45 टक्के लोकांना वाटत आहे. 18 टक्के लोकांना वीज - रस्ते हे मुद्दे मोठे वाटत आहेत. 15 टक्के लोकांनी बेरोजगारीचा, तर सहा टक्के लोकांनी बदल हा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलं आहे. फक्त तीन टक्के लोकांनी कायदा - सुव्यवस्था मुद्दा मोठा असल्याचं सांगितलं आहे. तर फक्त चार टक्के लोक भ्रष्टाराच्या मुद्यावर बोलले आहेत.