एस. जयशंकर आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार! पुढील महिन्यात संपणार कार्यकाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:29 AM2023-07-10T09:29:10+5:302023-07-10T09:29:51+5:30
गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आज गुजरातच्या गांधीनगरमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी ते रविवारी अहमदाबादला पोहोचले आहेत. दरम्यान, राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरातमधील तीन जागांचा समावेश असून त्यापैकी एका जागेसाठी एस. जयशंकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे.
एस. जयशंकर यांच्याशिवाय गुजरातमधील राज्यसभा खासदार दिनेश जेमलभाई अनावडिया आणि लोखंडवाला जुगल सिंह यांचा कार्यकाळही 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. दुसरीकडे, काँग्रेसने गुजरात राज्यसभा निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे. विधानसभेत त्यांच्याकडे फारशा जागा नसल्यामुळे काँग्रेसने यावेळी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष मनीष दोशी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले आकडे मिळाले नाहीत, त्यामुळे यावेळी आगामी राज्यसभा निवडणुकीत पक्ष सहभागी होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यसभेत जुलै आणि ऑगस्टमध्ये 10 जागा रिक्त होत आहेत. ज्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह गोव्यातील भाजपचे सदस्य विनय डी. तेंडुलकर, गुजरातमधील जुगलसिंह लोखंडवाला आणि दिनेशचंद अनावडिया, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर राय यांच्यासह काँग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे.
24 जुलैला मतदान होणार
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत उतरण्यासाठी उमेदवार 13 जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकतात आणि तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 17 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. दरम्यान, सध्या राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे 93 सदस्य आहेत. काँग्रेस 31 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीचे 12 खासदार आहेत.