अमेरिकेत भारतातून दत्तक घेतलेल्या मुलीची हत्या, परराष्ट्र मंत्रालयाने दिले कसून चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:09 PM2017-10-28T16:09:32+5:302017-10-28T16:14:05+5:30
अमेरिकेत भारतातून दत्तक घेतलेल्या तीन वर्षीय मुलीची वडिलांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून चौकशी आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत.
नवी दिल्ली- अमेरिकेत भारतातून दत्तक घेतलेल्या तीन वर्षीय मुलीची वडिलांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून चौकशी आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता यापुढे परदेशातील नागरिकांनी भारतातून दत्तक घेतलेल्या मुलांचे पासपोर्ट हे महिला व बालविकास मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच दिले जातील, असं परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतातून दत्तक घेतलेल्या शेरिन मॅथ्यूज या तीन वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालं.
EAM asked Min for Women & Child Dev for a thorough investigation into adoption of Sherin Mathews who was killed by her foster father in US pic.twitter.com/GsO5c8i1sf
— ANI (@ANI) October 27, 2017
7 ऑक्टोबर रोजी शेरिन डल्लास येथून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील वेस्ली मॅथ्यूज यांनी पोलिसांना दिली होती. सुरुवातीला वेस्ली याने पोलिसांना तक्रार देताना, झोपण्यापूर्वी दूध प्यायला नकार दिल्याने त्याने शेरिनला रात्री 3 वाजता घराबाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली होती, असं सांगितलं. त्यानंतर त्यांच्या घरापासून जवळच शेरिनचा मृतदेह आढळून आला होता.
adopted children will be issued only with prior clearance by Ministry of Child Development in all cases. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) October 27, 2017
पण, त्यानंतर वेस्ली मॅथ्यूजने पोलिसांना वेगळीच कथा ऐकवली. शेरिनचा मृतदेह मला आमच्या गॅरेजमध्ये सापडला असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. पण, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात शेरिनच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी वेस्लीला मुलीला गंभीर दूखापत केल्याप्रकरणी अटक केली होती. यावरुन शेरिनला मारहाण केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं.
भारत सरकारच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शेरिनच्या दत्तकत्वाची कसून चौकशी करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत.
शेरिनला तिच्या अमेरिकन पालकांनी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ‘मदर तेरेसा अनाथ सेवा आश्रमा’तून दत्तक घेतलं होतं. दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिच्या या अमेरिकन पालकांनी तिला अमेरिकेतील टेक्सास येथे आपल्या घरी नेले.