विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण सोपे नाही
By admin | Published: June 14, 2017 03:51 AM2017-06-14T03:51:03+5:302017-06-14T03:51:03+5:30
किंगफिशर एअरलाइन्स या आता बंद पडलेल्या विमान कंपनीच्या नावे बँकांकडून घेतलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त
- लोकमत न्यूज नेटवर्क
लंडन/नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्स या आता बंद पडलेल्या विमान कंपनीच्या नावे बँकांकडून घेतलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठीच्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी लंडनमधील न्यायालयात ६ जुलैपर्यंत तहकूब झाली. भारत सरकारने हे प्रत्यार्पण सोपे नसल्याचे म्हटले आहे.
प्रत्यार्पणाचे प्रकरण सुनावणीस येण्याआधी, मल्ल्यांना भारतात केव्हा आणणार, असे विचारले असता परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी सांगितले की, (हे) प्रत्यार्पण सोपे नाही ईडीकडे असलेली कागदपत्रे ब्रिटनला पाठविली आहेत. त्यांच्या कायद्यानुसार प्रत्यार्पण मंजूर होताच मल्ल्याला परत आणले जाईल.
मध्य लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात कोर्ट रूम क्र. ३ मध्ये चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा लाऊझी आॅर्बथनॉट यांच्यापुढे मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण आले. यात मंगळवारी फार काही होणे अपेक्षितही नव्हते कारण ते ‘केस मॅनेजमेंट’ या शीर्षकाखली होते. त्यामुळे मॅजिस्ट्रेटनी उभय पक्षांकडून दाखल झालेल्या दस्तावेजांचा आढावा घेतला आणि भारत सरकारकडून आणखी काही पुरावे सादर होणे अपेक्षित असल्याचे म्हणून ६ जुलै ही पुढील तारीख दिली. आणखी दोन तीन तारखा अशाच प्राथमिक तयारीत जातील व त्यानंतर सविस्तर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरविली जाईल, असे दिसते. त्यामुळे मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाच्या बाबतीत पुढील महिना दीड महिना तरी फारसे काही भरीव होण्याची अपेक्षा नाही.
स्वत: विजय मल्ल्या आपल्या वकिलांसह या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले. एप्रिलमध्ये त्यांना औपचारिक अटक करून लगेच जामिनावर सोडण्यात आले होते. प्रत्यार्पण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ‘ईडी’ आणि केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांची एक तुकडीही ब्रिटनला गेली आहे. तेथे भारत सरकारच्या वतीने ‘क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’चे प्रॉसिक्युटर काम पाहात आहेत. भारतातून गेलेली अधिकाऱ्यांची तुकडी या प्रॉसिक्युटरना भेटून वेळोवेळी ताजी माहिती व कागदपत्रे सुपूर्द करत आहे.