ईशान्य भारतात पूरस्थिती गंभीर: भीषण पुरामुळे आसाम, मेघालयमध्ये आणखी १२ मृत्यू, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:32 AM2022-06-20T09:32:45+5:302022-06-20T09:33:15+5:30
Flood in North East: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे.
गुवाहाटी: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे. दाेन्ही राज्यांमध्ये सुमारे ४० लाख नागरिक प्रभावित झाले असून पूर स्थितीत सुधारणा हाेण्याचे कुठलेही संकेत नाहीत.
आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. बचाव कार्यात एनडीआरएफच्या मदतीला लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. आसाममध्ये सुमारे १.५ लाखांहून अधिक लाेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये शनिवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. पाऊस आणि पुराचे पाणी अनेक ठिकाणी शिरल्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. काही रस्ते वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्रिपुरामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत आहे. पावसाचा जाेर कमी झाल्यामुळे पाणीपातळीत घट हाेत आहे.
ड्राेनद्वारे पूरस्थितीचा घेणार आढावा
आसाममधील पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी ड्राेनची मदत घेण्यात येणार आहे. आयआयटी गुवाहाटीने विकसित केलेल्या ड्राेनचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने संस्थेला संपर्क केला आहे. सर्वाधिक फटका असलेला परिसर आणि संपर्क तुटलेल्या गावांचा आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशात काेसळधारा
- मध्य प्रदेशमध्येही मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. भाेपाळ, जबलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस
झाला आहे.
- राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
राजस्थानात पूर्व माेसमी पावसाने दाणादाण
राजस्थानला पूर्व माेसमी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मान्सूनचे आगमन हाेण्यापूर्वीच काही नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. जयपूरसह श्रीगंगानगर, हनुमानगड, जोधपूरसह १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.