अतिरेकी झालेला प्राध्यापक ३६ तासांत ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:19 AM2018-05-07T02:19:44+5:302018-05-07T02:19:44+5:30
काश्मीर विद्यापीठातील एक प्राध्यापक मोहम्मद रफी भट घरातून गायब होऊन अतिरेक्यांच्या गटात सामील झाले, पण अवघ्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत त्यांना रविवारी प्राण गमवावे लागले. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बडीगाम गावात चकमकीत एका घरात लपून बसलेले जे पाच अतिरेकी ठार झाले त्यात प्राध्यापक भट यांचाही समावेश होता.
श्रीनगर : काश्मीर विद्यापीठातील एक प्राध्यापक मोहम्मद रफी भट घरातून गायब होऊन अतिरेक्यांच्या गटात सामील झाले, पण अवघ्या ३६ तासांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत त्यांना रविवारी प्राण गमवावे लागले. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बडीगाम गावात चकमकीत एका घरात लपून बसलेले जे पाच अतिरेकी ठार झाले त्यात प्राध्यापक भट यांचाही समावेश होता.
मोहम्मद रफी भट मध्य काश्मीरच्या गंदेरबाल जिल्ह्याच्या चुंदिना गावचे रहिवासी होते व काश्मीर विद्यापीठात समाजशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कंत्राटी नोकरीस होते. भट शुक्रवारी सायंकाळी घरातून गायब झाल्यावर ते कदाचित अतिरेक्यांना जाऊन मिळाले असावेत या शंकेने कुटुंबीयांनी लगेच पोलिसांत फिर्यादही नोंदविली होती.
लपून बसलेल्या जागेवरूनच प्राध्यापक भट यांनी आपले वडील फैयाज अहमद भट यांना फोन करून ‘मी आता अल्लाला प्यारा होणार आहे. काही चुकले असल्यास माफ करा’ असे सांगितले. गराडा घातलेले सुरक्षा दलांचे अधिकारी चकमकीच्या जागेतून बाहेर जाणारे टेलिफोन ‘मॉनिटर’ करीतच होते. भट यांनी केलेल्या फोनवरून तेही अतिरेक्यांमध्ये असल्याची पोलिसांना खात्री होती. पोलीस भट यांच्या घरी गेले व कुटुंबीयांनी भट यांना शरण येण्याचे आवाहन करावे यासाठी त्यांचे वडील, आई व पत्नीला सोबत घेऊन निघाले. काही झाले तरी तो शस्त्र हाती घेणार नाही, अशी वडिलांनी पोलिसांना खात्री दिली. मात्र, १८ किमीपर्यंत ते पोहोेचले व पोलिसांच्या वायरलेसवरून रफी चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. (वृत्तसंस्था)
पूर्वीपासूनच अतिरेकी प्रवृत्ती
मारल्या गेलेल्या प्राध्यापक भट यांचा अतिरेकी कल पूर्वीही दिसून आला होता. काश्मीरवर अन्याय होतो म्हणून त्याच्या वडिलांनाही बंडखोरांबद्दल सहानुभूती होती, पण त्यांनी कधी उघडपणे सरकारविरोधी कारवाया केल्या नाहीत. १८ वर्षांचे असताना मोहम्मद रफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले होते. घरच्या लोकांनी त्यांना मन वळवून परत आणले. पुढे ते पी.एचडीपर्यंत शिकले, प्राध्यापक झाले व त्यांचे लग्नही झाले. तरी मूळ पिंड गेला नाही.