देशात ठिकठिकाणी अतिरेकी हल्ल्याचे कट
By admin | Published: October 11, 2016 06:28 AM2016-10-11T06:28:11+5:302016-10-11T06:28:11+5:30
उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्समुळे तेथील लष्कर आणि अतिरेकी कमालीचे संतापले
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्समुळे तेथील लष्कर आणि अतिरेकी कमालीचे संतापले असून, त्यांनी आता भारताच्या संसद भवनावर हल्ला करण्याचा कट
रचला असल्याचे सांगण्यात येत आहे. सईद हाफिजची लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिद्दिन या संघटनाही भारतात घुसून हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून, त्या संघटनेचे काही अतिरेकी पाकिस्तानी रेंजर्सच्या
वेषात पाकिस्तानच्या सीमा भागात वावरताना दिसले आहेत.
एकीकडे संसद भवनावर हल्ला आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी कारवाया अशी योजना आखण्यात आल्याचा अंदाज असून, सुमारे २५0 दहशतवादी काश्मीर खोऱ्यात आजच्या घडीला असून, त्यापैकी १0७ जण काश्मीरमधील आहेत आणि उरलेले १४३ पाकिस्तानातून घुसले आहेत, असे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ लाँचिंग पॅडवर दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. दहशतवाद्यांनी तीन गट बनवले असून, एक गटाच्या प्रमुखपदी महिला
आहे. लष्करचा कमांडर अबु दुजाना या सर्वांना सूचना देत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी टॅप केलेल्या फोन संभाषणातून उघड झाले आहे.
काश्मीरमध्ये हल्ले घडवण्याबरोबरच तिथे स्थानिकांच्या मदतीने पुन्हा हिंसाचार निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लष्कर, सीमा सुरक्षा दल, तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शस्त्रास्त्रे उत्पादक, पुरवठादारांनातयार राहण्यास सरकारचे संकेत-भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईनंतर, पाकिस्तान-भारत यांच्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसंगी शस्त्रास्त्रे पुरवठादारांना आणि शस्त्रास्त्रे उत्पादकांना उत्पादन वाढविण्यास आणि अत्यंत कमी कालावधीत पुरवठा करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.
सशस्त्र दलांकडून आलेल्या तातडीच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठीची कार्यक्षमता आणि क्षमता तपासून घ्या, असे सांगण्यात आले आहे. गरज भासल्यास तातडीने अतिरिक्त शस्त्रांच्या पुरवठ्यासाठी करार केले जाण्याचीही शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सरकारने अशी चौकशी केली होती. संरक्षण मंत्रालयाला छोटी शस्त्रे आणि दारूगोळा, तसेच सुखोई आणि मिराज या लढावू विमानांसाठी सुटे भाग तातडीने हवे आहेत.
युद्ध सुरू झाल्यास भासू नये शस्त्रांची टंचाई...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरक्षेच्या गरजा भागविण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ केली जाऊ शकते, असे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. पूर्ण युद्ध सुरू झाल्यास व ते लांबल्यास शस्त्रांची टंचाई भासू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. चीनच्या सीमेवर युद्धात लागणाऱ्या साठ्यात घट झाली असून, तो इतका कमी आहे की, युद्ध पेटलेच, तर काही बाबतीत तो चार दिवसही पुरणार नाही.