अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण
By admin | Published: September 6, 2015 11:54 PM2015-09-06T23:54:47+5:302015-09-06T23:54:47+5:30
Next
>-बंगळूरला कोठडीत दिली कबुली-आयएमचा खतरनाक अतिरेकी-सईद अफाक पाच दिवस गोव्यात- गोव्यासह सर्वच सुरक्षा यंत्रणा अंधारात पणजी : गोव्यात अतिरेकी येऊन लपल्याचे आतापर्यंत उघडकीस आले होते; परंतु इंडियन मुजाहिद्दीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक हा तर गोव्यात येऊन पॅराग्लायडिंगचे पाच दिवस प्रशिक्षणही घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या अतिरेक्याच्या कोठडीतील तपासादरम्यान ही माहिती उघड झाली. अफाकला 8 जानेवारी 2015 रोजी बंगळुरू येथे अटक केले होते. तो राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत सध्या बंगळूरमध्येच आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अफाकची कोठडीत चौकशी केली होती तेव्हा त्याने अनेक महत्वाच्या गोष्टींची कबुली दिली. त्यात त्याने गोव्यात येऊन पॅराग्लायडिंग प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले आहे. बंगळुरू येथील एका प्रशिक्षकाकडून त्याने पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले, असे त्याने सांगितल्याचा उल्लेख एनआयएच्या आरोपपत्रात आहे. गोव्यात पॅराग्लायडिंग नोव्हेंबरच्या सुमारास होते. बंगळुरूमधील केवळ एकमेव प्रशिक्षक गोव्यात येतो व त्याचे नाव नरेंद्र रमण असे आहे. हरमल व किनारी भागात तो पॅराग्लायडिंग शिकवतो. केरी येथे एका भाड्याच्या खोलीत तो राहात होता. गोव्यात पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफाकने अमेरिकेतून दोन पॅराग्लायडिंगची सेकंड हँड किट्सही खरेदी केली होती; परंतु त्यानंतर त्याने गोव्यात पुन्हा पॅराग्लायडिंग केले की नाही याबद्दल काही माहिती एनआयएला मिळाली नाही. खतरनाक अतिरेकी त्रिकुटापैकी जानेवारीत अफाक आणि अब्दस सबुर (24) यांना बंगळुरू येथे अटक केली होती तर सद्दाम हुसैन (35) याला भटकळमध्ये अटक केली होती. त्यानंतर एनआयएकडून त्याची चौकशी सुरू केल्यानंतर या त्रिकुटापैकी अफाकच्या गोव्यातील वास्तव्याबद्दल माहिती उघड झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पॅराग्लायडर्सवरही नजर ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून दिल्या आहेत. गोव्यात अतिरेकी येऊन पाच दिवस प्रशिक्षण घेऊन गेल्याचा सुगावा गोव्यातील पोलीस यंत्रणेला तर लागला नव्हताच; परंतु या अतिरेक्याने स्वत: कबुली देण्यापूर्वी एनआयएलाही लागला नव्हता. एवढेच नव्हे तर पॅराग्लायडिंग प्रशिक्षकालाही त्याची कल्पना नव्हती, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. (बॉक्स)एकट्यास प्रशिक्षण द्याअफाकच्या प्रशिक्षकाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफाक हा आपल्याला एकट्यालाच स्वतंत्र प्रशिक्षण देण्यास सांगत होता. त्या पॅराग्लायडिंग व्यतिरिक्त टँडेम पॅराग्लायडिंगमध्येही त्याला रस होता. याशिवाय भटकळ भागात पॅराग्लायडिंग शक्य आहे का, याची माहितीही तो घेण्याचा प्रयत्न करीत होता.