सावधान! डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:09 AM2020-05-31T05:09:45+5:302020-05-31T05:09:56+5:30
भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले की, त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती
चीनमध्ये व जगात पहिल्यांदा ‘कोरोना’बद्दल जाहीरपणे नव्या व घातक विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे, असा सूतोवाच करणारे डॉ. ली वेनलीआंग हे नेत्रतज्ज्ञच होते. पुढे त्यांचा ही कोरोनाने मृत्यू झाला. आज दु:खाची गोष्ट म्हणजे, डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते, याबद्दल अजून अनेकांना पुरेशी माहिती नाही.
भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले की, त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती; तसेच अनेक नेत्ररोग तज्ज्ञांनी डोळे आलेल्या म्हणजे कंजक्टिवायटीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची शंका व्यक्त केली व तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. महाराष्ट्र आॅफथॅल्मिक सोसायटीचे राज्याचे सचिव नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया सांगतात की, सध्या साथीच्या वातावरणात डोळे आलेला रुग्ण कोरोनाचा असू शकतो ही शक्यता आहे. त्यातच जर तुमचा कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे कोरोना असल्याचे निदान झाले असेल व तुमचे डोळे आले असतील, तर हेच लक्षण कोरोनाची सुरुवात असू शकते. अजून डोळे येणे या लक्षणाची कोरोनासाठी टेस्टिंग करण्याच्या निर्देशात समावेश नसला, तरी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तो करण्याची गरज आहे.
आपण कोरोनाची जोखीम जास्त असलेल्या वर दिलेल्या घटकात आहात का ? हे सांगावे. नेत्ररोगतज्ज्ञ वैद्यकीय इतिहास जाणून तुम्हाला कोविड रुग्णालयात जायचे का व कोरोनाची तपासणी करणे गरजेचे आहे का ? या विषयी सल्ला देतील.
डोळे येण्यासाठी औषध दुकानातून प्रिस्क्रिपशन व नेत्र रोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर द काऊंनटर डोळ्याचे ड्रॉप घेणे हे सर्रास केले जाते; पण साथीच्या या काळात व इतर वेळीही असे मुळीच करू नये. याने डोळ्यांना इजा होऊ शकते .
पुढील लोकांचे डोळे आल्यास जास्त शक्यता आहे की डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे -
डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ
पोलीस, स्वच्छता कर्मचारी
फिल्डवर कोरोना वार्तांकन करणारे पत्रकार
थेट लोकांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते
हॉटस्पॉट, कन्टेन्मेंट झोनमधील सर्व नागरिक
तुमचे डोळे आले असतील, तर आपल्या नेत्र रोगतज्ज्ञांना फोन द्वारे फोटो पाठवून टेली कन्सल्टेशन घ्यावे.
- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून,
वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)