आलोक वर्मा यांच्या घरावर आयबीची पाळत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:01 AM2018-10-26T04:01:02+5:302018-10-26T04:01:22+5:30
केंद्र सरकारला संकटात टाकणाऱ्या आलोक वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्नच झाला.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना सक्तीने घरी बसवल्यानंतर आणि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, केंद्र सरकारला संकटात टाकणाऱ्या आलोक वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्नच झाला.
सीबीआय विरूध्द सीबीआय संघर्षात आलोक वर्मा यांच्या जनपथ येथील निवासस्थानी ४ संदिग्धांना पकडण्यात आले. बुधवारी मध्यरात्री २ कारमधून आलेल्या चौघांच्या संशयास्पद हालचाली पाहून, बंगल्याच्या सुरक्षा कर्मचाºयांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते पळू लागले. सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना पकडले व बकोट धरून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. चारही संदिग्धांकडे इंटिलिजन्स ब्युरोची ओळखपत्रे सापडली. धीरजकुमार सिंह, अजय कुमार ज्युनिअर इंटिलिजन्स आॅफिसर, तर प्रशांत कुमार व विनीतकुमार गुप्ता सहायक अधिकारी आहेत, असे स्पष्ट झाले. गुरुवारी दुपारी त्यांना सोडून देण्यात आले. आयबीचे उच्चपदस्थ अधिकारी या प्रकारामुळे संतापले आहेत. शर्टाची कॉलर पकडून अधिकाºयांना फरफटत नेल्याने अन्य अधिकाºयांचे मनोधैर्य खचले आहे, या शब्दांत त्यांनी नाराजी नोंदवल्याचे समजते.
>हे नेहमीचे काम?
आयबीच्या सूत्रांनी सांगितले की राजधानी दिल्लीच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये पेट्रोलिंग ड्यूटीवर रोजच आयबी अधिकारी असातात. हे कायम चालणारे काम आहे. त्यात नवे काहीच नाही. तथापि, वर्मांच्या निवासस्थानाबाहेर एखाद्या हेरांसारखे हे चौघे कशासाठी मध्यरात्रीपासून पाळत ठेवून होते? याचा खुलासा झाला नसल्याने, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.