जुन्या सेंट्रो कारवर चोरांची नजर
By Admin | Published: February 9, 2017 03:29 PM2017-02-09T15:29:33+5:302017-02-09T15:36:24+5:30
अहमदाबादमध्ये कारचोरट्यांची एक गँग सक्रिय झाली असून हे चोर सेंट्रो कार लांबवत आहेत
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 9 - अहमदाबादमध्ये कारचोरट्यांची एक गँग सक्रिय झाली असून, या चोरांनी गेल्या सहा महिन्यात 12 कार चोरी केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे हे चोर जुन्या सेंट्रो कारची चोरी करत आहेत.
हे चोर या कार चोरून मुंबईतील विक्रेत्यांना विकत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. जेणेकरून त्यांचा टॅक्सीसारखा वापर करता येईल. मुंबईत टॅक्सी म्हणून सेंट्रो कार बऱ्यापैकी प्रचलित असून, आता या कारचे उत्पादन बंद झाल्याने मुंबई विक्रेते जुन्या कार खरेदी करून त्या महाराष्ट्रातील डमी आरसी नंबरसह विकत आहेत. या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे.
हे चोर कार चोरण्यासाठी मास्टर कीचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच चोरी करण्यात आलेल्या कारपैकी बहुतांश कार पार्किंग आणि प्लॉट्समधून चोरण्यात आल्या आहेत. तसेच चोरी करण्यात आलेल्या कारची निर्मिती 2005 ते 2008 या काळात झाल्याचेही समोर आले आहे. कार चांगल्या अवस्थेत असल्याची पडताळणी करूनच चोर त्या कार लांबवत आहेत. मात्र अद्यापतरी या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.