मेसेज फॉरवर्डिंगवर फेसबुकचीही मर्यादा, एकाच वेळी पाच जणांना मेसेज पाठवता येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:00 AM2020-09-05T04:00:27+5:302020-09-05T04:01:15+5:30
खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे.
नवी दिल्ली : संदेश अग्रेषित (फॉरवर्र्डिंग मेसेज) करण्याच्या संख्येवर फेसबुकने मर्यादा घातली असून आता एकाचे वळी पाच जणांना किंवा ग्रुपला मेसेज पाठविता येईल. मेसेज फॉरवर्ड करण्याची संख्या मर्यादित करण्यात आल्याने चुकीच्या माहितीचा प्रसार होण्यास आळा बसेल आणि वास्तव जगात कमी नुकसान होईल, असे फेसबुकने म्हटले आहे.
खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण आणि नुकसानकारक माहितीच्या प्रसारास पायबंद घालण्यासाठी फेसबुकने ही मर्यादा घातली आहे. व्हॉटस्अॅपच्या धर्तीवरच फेसबुकने फॉरवर्ड मेसेजची संख्या मर्यादित केली आहे. यामुळे एखादा मेसेज एकाच वेळी मर्यादित लोकांनाच पाठविता येईल. या नवीन सुविधेची चाचणी फेसबुकने मार्चपासून सुरू केली होती. २४ सप्टेंबरपासून जगभर ही सुविधा लागू केली जाईल. यामुळे आॅनलाईन वावरताना लोक सुरक्षित राहतील, असा विश्वास फेसबुकने व्यक्त केला आहे.
लोकांना सुरक्षितता आणि खाजगी मेसेजचा अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ही नवीन पद्धत सुरू करीत आहोत. चुकीची आणि नुकसानकारक माहिती, संदेशाच्या प्रसाराला आळा घालण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच फेसबुकने अवांछित संदेश रोखणे आणि त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने सूचित करणारी पद्धत सुरू केली होती.