फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:21 AM2018-03-24T04:21:13+5:302018-03-24T04:21:13+5:30

फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 Facebook login information is sold at just Rs 340 | फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांत

फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांत

Next

मुंबई : फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे.
अमेरिकेतील निवडणुकीसाठी ५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स चोरण्यात आले होते. ही माहिती जर वरील किमतीला विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे.
फेसबुकसोबत आपण जे अ‍ॅप अटॅच करतो, एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण जिथे लॉग इन करतो, अशा अ‍ॅपच्या माध्यमातून ही डेटाचोरी होऊ लागली आहे. बिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने डेटाचोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा असंख्य कंपन्यांनी आतापर्यंत फेसबुकवरून डेटा चोरला आहे. डार्क वेब मार्केटमध्ये जिथे कोणतेच वैध व्यवहार होत नाहीत, तिथे तुमचा हा डेटा जाहिरातदारांना, रिसर्च कंपन्यांना विकला जातो. ड्रीम, पॉइंट आणि वॉल स्ट्रीट मार्केट अशा तीन डार्क वेब मार्केटचा अभ्यास एका कंपनीने केला आहे.

म्हणून झुकेरबर्गची मान झुकली!
सोशल मीडियाच्या जगात अग्रगण्य आणि नावाजलेली असलेल्या फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे मात्र नामुष्कीची वेळ आली. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मार्क झुकेरबर्गला माफी मागावी लागली. भारतासारख्या देशातील आगामी निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी फेसबुक आपल्या सुरक्षा सुविधेत वाढ करणार असल्याचे त्याला सांगावे लागले आहे.

जी-मेलचा डेटा मिळतो स्वस्त
या कंपनीने दावा केला की जी-मेल, उबेर व ग्रुबहबच्या सेवांवर असलेली तुमची माहितीही फेसबुकपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहे. एखाद्या कंपनीने घासाघीस केल्यास, तुमचा जी-मेल आयडी आणि पासवर्ड केवळ ६५ रुपयांत विकला जातो. उबरवरील तुमची माहिती ४५५ रुपये तर ग्रुबहबवरील माहिती ५८५ रुपयांना विकली जाते.

हॅकिंगपासून राहा सावध
हा सर्व डेटा हॅकर्स आपल्याकडे जमवतात आणि नंतर विक्री करतात. त्यामुळे तुम्हाला फारशी माहिती नसलेले अ‍ॅप, ई-मेल्स आणि व्यक्तींपासून आॅनलाइन असताना दूरच राहिलेले बरे. एखाद्या साध्या लिंकवरूनही तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करताना सावध असलेलेच बरे.

महेश शर्मा यांच्यासाठी काम
२००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यासाठीही या कंपनीने काम केले. परंतु, लोकप्रियताच नसल्याने शर्मा यांचा उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर मतदारसंघात १६ हजार मतांनी पराभव झाला.

यूपीत भाजपाला मदत
अवनीश राय यांनी एनडीटीव्हीला सांगितल्यानुसार आॅल्व्हेनो बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला मदत केली. कंपनीने भाजपाला मतदारांची जातीनिहाय आणि वयानुसार माहिती पुरवली. ही माहिती रा. स्व. संघाचे संजय जोशी यांच्या घरी देण्यात आली तेव्हा सध्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

काँग्रेसला पराभूत करण्यासाठी...
केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाशी संबंधित स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीजने भारतातही कंपनी सुरू केली. भारतातील निवडणुका, मतदारांचा कौल जाणून घेतानाच त्यांची माहिती पक्षांना/उमेदवारांना देण्याचे काम कंपनी करत होती.
कंपनीने काँग्रेससोबत काम करण्यासाठी पाच मतदारसंघांतील माहिती मोफत देण्याची तयारीही ठेवली होती. ते राहुल गांधी यांना खूश करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हाच एक अमेरिकन-गुजराती महिला कंपनीत आली आणि त्यानंतर कंपनीने स्ट्रॅटेजी बदलली.
काँग्रेससाठी काम सुरू असूनही काँग्रेसलाच पराभूत करण्यासाठी कंपनीतील कर्मचारी काम करू लागले, असे कंपनीचे संचालक अवनीशकुमार राय यांनी ‘द प्रिंट’ वेबसाइटला सांगितले आहे. पुढे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

भाजपा ही खोटारड्यांची फॅक्टरी!
नवी दिल्ली : भाजपा खोटारड्यांची फॅक्टरी आहे. तेथील कर्मचारी काँग्रेसविरोधात खोट्या बातम्या पेरतात. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाशी काँग्रेसचा संबंध असल्याची खोटी बातमीही त्यांनीच पसरवल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेसने निवडणुकीसाठी डेटा चोरणाºया कंपनीची मदत घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा भाजपाला लक्ष्य केले. भाजपा मंत्र्यांना खोटे बोलण्यास भाग पाडत आहे.
२०१२ मध्ये काँग्रेसची रणनीती उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपाने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाची मदत घेतल्याची बातमी एक पत्रकार देणार होता. त्याआधीच भाजपाच्या मंत्र्याने काँग्रेसवर खोटे आरोप लावले, असे टिष्ट्वट राहुल यांनी केले. डेटा चोरण्याचा आरोप असलेल्या केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या भारतातील भागीदारांनी दिलेल्या आॅनलाइन बातमीची लिंकही त्यांनी दिली आहे.

Web Title:  Facebook login information is sold at just Rs 340

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.