फेसबुकने बनवली जोडी! दहावी पास पानवाल्याशी लग्न करण्यासाठी फिलिपिन्सवरून आली 'ती'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:23 PM2022-11-08T12:23:21+5:302022-11-08T12:31:55+5:30
पान विकणाऱ्या एका तरुणाने फेसबुकवर फिलिपिन्समध्ये राहणाऱ्या एका महिलेशी मैत्री केली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं.
कधी, कोण, कुठे, कसं कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकत असतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये प्यारवाली लव्हस्टोरी पाहायला मिळाली आहे. पान विकणाऱ्या एका तरुणाने फेसबुकवर फिलिपिन्समध्ये राहणाऱ्या एका महिलेशी मैत्री केली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. आता हे दोघंही 20 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. दोघांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी पास झालेल्या सूरतच्या तरुणाला इंग्रजी भाषाही येत नव्हती. पण असं म्हणतात की, प्रेम हे सर्वकाही शिकवतं. ट्रान्सलेशन करणाऱ्या एप्लिकेशनच्या माध्यमातून फेसबुकवर दोघांमध्ये चॅटिंग झालं आणि आता काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही महिला लग्नासाठी सूरतला आली असून इथेच दोघंही लग्न करणार आहेत.
सूरतमध्ये कल्पेश भाई मावजीभाई काछडिया यांची पानटपरी आहे. त्यांना चालता येत नाही. 43 वर्षीय कल्पेश यांचा दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबातील सर्वजण विवाहित आहेत. चालता येत नसल्याने कल्पेश यांना लग्न करायचे नव्हते. 2017 मध्ये त्यांना फेसबुकवर रेबेका नावाच्या 42 वर्षीय महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. कल्पेश यांना इंग्रजी येत नव्हते, त्यामुळे रेबेका यांचा मेसेज आला की ते मित्रांना विचारून इंग्रजीत उत्तर द्यायचे.
रेबेका यांच्य़ा पतीचे निधन झाले असून त्या आता एकट्या असल्याचेही कल्पेश यांना सांगितलं. रेबेका आणि कल्पेश हे दोघे गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे रेबेका भारतात येऊ शकल्या नाहीत. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. त्यामुळे रेबेका यांनी 2020 मध्ये भारतात येण्याचा प्लॅन केला. त्याचे तिकीटही बुक झाले होते.
24 मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे त्या भारतात येऊ शकल्या नाहीत. ऑक्टोबर 2022 मध्ये रेबेका दिवाळीच्या दिवशी भारतात आल्या होत्या. दोघेही एकमेकांना भेटून खूप खूश होते. कल्पेश यांनी रेबेकाची घरच्यांशी ओळखही करून दिली. त्यानंतर घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला. आता हे दोघंही भारतीय परंपरेनुसार 20 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"