फेसबुकच्या घोडचुकीमुळे कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली दहशतवाद्यांना
By admin | Published: June 18, 2017 04:14 PM2017-06-18T16:14:54+5:302017-06-18T16:59:05+5:30
सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनवधानानं फेसबुककडून ही माहिती दहशतवाद्यांना मिळाल्याचं वृत्त द गार्डियन या वृत्तपत्राने दिलं आहे. फेसबुकमधील तांत्रिक बिघाडानं जवळपास 22 विभागांतल्या 1 हजार कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांना मिळाल्याची बाब समोर आली आहे.
फेसबुकच्या 1 हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. माहिती लीक झालेले कर्मचारी फेसबुकवर दहशतवाद्यांचा प्रचार, प्रसार आणि अश्लील पोस्ट रोखण्याचे काम करतात. सॉफ्टवेअरमधील बगमुळे या कर्मचाऱ्यांचीच माहिती दहशतवाद्यांना मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी संशयित दहशतवाद्यांना फेसबुकवर बॅन केले होते, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती बॅन करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मिळाली आहे. या सर्व प्रकरणानं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका कर्मचाऱ्याने राजीनामा देत घरी बसणे पसंत केले आहे.
(आता फेसबुक रोखणार दहशतवाद)
फेसबुकने नोव्हेंबरमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिघाड कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली. वाढत्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी आणि त्यासंदर्भातील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकने विशेष सुविधा सुरू केली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, भावना भडकावणाऱ्या पोस्ट फेसबुककडून डिलीट केल्या जाणार आहेत. त्याबद्दलच्या तंत्रज्ञानादरम्यानच फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली. फेसबुकनेदेखील चूक झाल्याचे मान्य केले असून, असा प्रकार टाळण्यासाठी तांत्रिक बदल करू, असे म्हटले आहे.