बीएसएफ जवानांवर महिलेचे फेसबुक जाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:19 AM2018-09-22T05:19:57+5:302018-09-22T05:20:08+5:30
हेरगिरी केल्याच्या आरोपावरून नोएडा येथून बुधवारी अटक करण्यात आलेला बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्रा याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने फेसबुकचा डोकेबाज वापर केला होता.
लखनौ : हेरगिरी केल्याच्या आरोपावरून नोएडा येथून बुधवारी अटक करण्यात आलेला बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्रा याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने फेसबुकचा डोकेबाज वापर केला होता. त्यावर एका महिलेच्या नावे बनावट खाते उघडून त्याद्वारे मिश्राने फेसबुकवर झळकविलेली छायाचित्रे व पोस्टवर लाइक्स व कमेंटचा मारा करून, संवाद साधून त्याला हेरगिरीसाठी वश करण्यात आयएसआय यशस्वी ठरली.
फेसबुकवर अच्युतानंद याने झळकविलेले छायाचित्र आवडल्याचा संदेश त्याला एका अनोळखी महिलेच्या अकाऊंटवरून आला. त्यामुळे पघळून त्याने तिला मैत्रीची विनंती पाठविली. ती मंजूर होताच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्याची फेसबुकवरील छायाचित्रे व पोस्ट यांचे कौतुक होऊ लागताच हा जवान तिच्या कह्यात गेला. मुळात ते खाते बनावट होते हे अच्युतानंदच्या लक्षात आले नाही. या खात्यातील व्यक्तीने अजून ९० भारतीयांना मित्रांच्या यादीत सामील केले होते. फेसबुकवरील बनावट खात्यांद्वारे आयएसआयने भारतात केवळ लष्करातीलच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही आपल्या जाळ्यात ओढल्याची प्रकरणे गेल्या काही महिन्यांत उजेडात आली आहेत.
राजस्थानमध्ये १९ वर्षे वयाच्या युवकालाही असेच फेसबुकवरून मोहित करण्यात आले होते व त्याच्याकडून हवी ती माहिती आयएसआयने मिळवली होती.
>कामासाठी मिळते मानधन
प्रसारमाध्यमांतील एखाद्या महत्त्वाच्या संस्थेत संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे भासवून फेसबुकवरील एखाद्या अकाऊंटवरून आयएसआय भारतातील बेरोजगार तरुणांशी संपर्क साधते. लष्कराविषयी विशिष्ट माहिती जमा करून देण्याविषयी त्यांना सांगितले जाते.
असेच काम करीत राहिल्यास महिन्याला प्रत्येकी ४ हजार रुपये मानधन देऊ, असेही या तरुणांना आमिष दाखविले जाते. उत्पन्नाचे कसलेच साधन नसलेले तरुण या लहान रकमेसाठी काहीही करायला तयार होतात, असे दिसून आले आहे.