आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:31 AM2024-09-19T05:31:37+5:302024-09-19T05:32:08+5:30
या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची सुरुवात केली. योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. २०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होईल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (पीएफआरडीए) ही योजना राबवण्यात येणार आहे.
काय आहेत योजनेच्या अटी?
n१८ वर्षांपर्यंतची सर्व मुले यासाठी पात्र असतील. खाते फक्त मुलांच्या नावाने उघडले जाईल; परंतु त्यांचे पालक पैसे जमा करतील. मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील.
nजवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे उघडले येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म ई-एनपीएसद्वारे देखील उघडू शकतात.
nहे खाते कमीत कमी १००० रुपयांनी उघडता येईल. यात गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल.
nतीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल.
nमुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. मूल १८ वर्षांचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही.