Fact Check: ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नसल्यास नेब्युलायझरचा वापर होऊ शकतो? जाणून घ्या सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:16 PM2021-04-25T12:16:55+5:302021-04-25T12:22:37+5:30
oxygen cylinder : कोरोना रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा कमी पडत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २७६७ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोना रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा कमी पडत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Fact Check: Can nebulizer be used if oxygen cylinder is not available? Know the truth ...)
अशा परिस्थितीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कोरोना रूग्णांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर मशीन वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांनी नेब्युलायझर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये स्वत: ला सर्वोदय रुग्णालयाचे डॉक्टर आलोक असल्याचे सांगणारा व्यक्ती कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर मशीन वापरण्याचा सल्ला देत आहेत. या व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, वातावरणात पुरेसा ऑक्सिजन आहे, जो नेब्युलायझर मशीनच्या सहाय्याने घेतला जाऊ शकतो.
(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांत ३,४९,६९१ नवे रुग्ण, २७६७ जणांचा मृत्यू )
दरम्यान, ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी नेब्युलायझरविषयी ज्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, याबद्दल ट्विट करुन सर्वोदय रुग्णालयाने हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नकली असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाच्यावतीने असे सांगितले गेले की, हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या वैज्ञानिक अभ्यासावर आधारित नाही.
याचबरोबर, सर्वोदय रुग्णालयाने अशा प्रकराचा कोणताही दावा पूर्णपणे फेटाळला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारचा प्रयोग करू नका, हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही असे सर्वोदय रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
(Delhi Lockdown : दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता)
डॉ.आलोक यांच्याकडून स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून सर्वोदय रुग्णालयाने डॉ. आलोक यांच्याकडे जाब विचारला असता त्यांनी आपल्याकडून चुकीचा मेसेज गेल्याचे स्पष्टीकरण दिले. ऑक्सिजन सिलिंडरऐवजी नेब्युलायझर मशीन वापरणे चुकीचे आहे. हा योग्य पर्याय नाही, असे डॉ. आलोक यांनी म्हटले आहे.