नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:10 PM2019-05-03T13:10:59+5:302019-05-03T13:13:46+5:30

नेहरुंमुळे हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेल्याचा मोदींचा दावा

fact check did 1954 stampede in kumbh mela happen because of jawaharlal nehru as pm narendra modi said | नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमधून अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 1954 मध्ये कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरलं. उत्तर प्रदेशातल्या कौशांबीत एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्यावेळी हजारो लोकांचे प्राण गेले. मात्र कोणालाही एका रुपयाचीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. उलट याबद्दलच्या बातम्या काँग्रेसकडून दाबण्यात आल्या, असा दावा करत मोदींनी नेहरुंवर शरसंधान साधलं. 

पंतप्रधान मोदींच्या आरोपांनंतर खरंच त्या घटनेला नेहरु जबाबदार होते का, त्यावेळी काँग्रेसनं ही बातमी दाबली होती का, असे सवाल उपस्थित झाले. 1954 मध्ये भारतात टीव्ही नव्हते. त्यामुळे लोक माहितीसाठी वर्तमानपत्रांवर आणि रेडिओवर अवलंबून होते. काही वरिष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्या चेंगराचेंगरीसाठी नेहरुंना जबाबदार धरता येणार नाही. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांनी दोन गोष्टींकडे लक्ष वेधलं. ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी नेहरु तिथे उपस्थितच नव्हते. याशिवाय त्या काळी आजच्या सारखं तंत्रज्ञान नसल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. 

चेंगराचेंगरीला नेहरु जबाबदार?
वरिष्ठ पत्रकार पीयूष बबेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यात 3 फेब्रुवारी 1954 रोजी चेंगराचेंगरी झाली. पंडित नेहरु या दिवशी कुंभमेळ्याला आले नव्हते. ते 2 फेब्रुवारीला कुंभमेळ्यात स्नान करुन परतले होते. त्यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पीयूष बबेले यांनी नेहरु वाड्मयाच्या 25 व्या खंडाचा आणि नेहरुंच्या संसदेतल्या भाषणाचा संदर्भ दिला. 

चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी नेहरुंनी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी मृतांबद्दल संवेदना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं होतं. प्रयागराजमधले वरिष्ठ पत्रकार नरेश मिश्र यांनीदेखील नेहरु चेंगराचेंगरीच्या दिवशी नव्हे, तर त्याच्या एक दिवस आधी कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचं सांगितलं. 3 फेब्रुवारीला राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद कुंभमेळ्याला उपस्थित होते. ते किल्ल्याच्या बुरुजावरुन कुंभमेळा पाहत असताना संन्याशांचा मोठा जमाव तिथे आला. त्याचवेळी दोन पेशवाई मिरवणुका तिथून जाऊ लागल्या आणि चेंगराचेंगरी झाली, असं मिश्र म्हणाले.

काँग्रेसनं बातमी दाबली?
कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीचे साक्षीदार असलेल्या नरेश मिश्र यांनी तिथल्या भीतीदायक परिस्थितीचं वर्णन केलं. 'जवळपास 45 मिनिटं चेंगराचेंगरी सुरू होती. परिस्थितीवर कोणाचंच नियंत्रण नव्हतं. 45 मिनिटांनंतर परिस्थिती निवळली. मात्र तोपर्यंत 700-800 जणांचा मृत्यू झाला होता. हा आकडा सरकारी होता. त्यामुळे खरा आकडा हजारपेक्षा अधिक असण्याची शक्यता असू शकेल,' असं मिश्र यांनी सांगितलं. पुढील अनेक महिने या चेंगराचेंगरीची चर्चा झाली आणि त्यावेळच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.  
 

Web Title: fact check did 1954 stampede in kumbh mela happen because of jawaharlal nehru as pm narendra modi said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.