Fact Check: RBI ने UPI पेमेंटसाठी Google Pay ला परवानगी दिली नाही? जाणून घ्या व्हायरल दाव्यांचे सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 03:24 PM2022-11-08T15:24:43+5:302022-11-08T15:29:21+5:30
Google Pay: भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI पेमेंटसाठी Google Pay ला मान्यता दिलेली नाही, असा मेसेज व्हायरल होत आहे.
Fact Check of Google Pay: आजच्या काळात सोशल मीडिया हे माहितीचे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. पण, कधी-कधी अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यांचे क्रॉस चेकिंग फार महत्त्वाचे असते. बदलत्या काळानुसार युनिफाइड पेमेंट सिस्टम वापरणे ही आजच्या काळात सर्वसामान्यांची गरज बनली आहे. अलीकडच्या काळात पेटीएम, फोनपे, गुगल पे इत्यादींचा वापर खूप वेगाने वाढला आहे. अशातच, Google Pay बद्दलची एक बातमी खूप वेगाने व्हायरल होत आहे.
काय व्हायरल होतंय?
या बातमीत असा दावा केला जातोय की, भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI पेमेंटसाठी Google Pay ला अधिकृत मान्यता दिलेलीच नाही. अशा परिस्थितीत गुगल पे वापरणारे लोक ही व्हायरल पोस्ट पाहून खूप नाराज झाले आहेत. तुम्हीही ही व्हायरल पोस्ट पाहिली असेल, तर आम्ही तुम्हाला या बातमीचे सत्य सांगणार आहोत.
हा दावा केला जातोय
सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), जे भारतातील UPI पेमेंटशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे नियमन करते. याने UPI पेमेंटसाठी Google Pay ला अधिकृत केलेले नाही. एखाद्या यूजरला UPI पेमेंट करताना काही अडचण येत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तक्रारही दाखल करू शकत नाही. कारण ती NPCI आणि RBI द्वारे मान्यताप्राप्त पेमेंट सिस्टम नाही, असेही यात म्हटले आहे.
Claim: #GooglePay is not authorized by the @RBI as a payment system under the National Payments Corporation of India (NPCI)#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 6, 2022
✅This claim is #Fake
✅ According to the @NPCI_NPCI, Google Pay is an authorized #UPI payment services provider
🔗https://t.co/TbJ39cVP2jpic.twitter.com/Ps6UAd2Sco
PIBने तथ्य समोर आणले
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल दाव्याची सत्यता तपासली असून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की, आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे की Google Pay RBI ची मान्यता नाही. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. या दाव्यात अजिबात तथ्य नाही. Google Pay ही NPCI मान्यताप्राप्त पेमेंट सेवा प्रदाता आहे. यावर NPCI चे सर्व नियम लागू आहेत. यासोबतच, काही विसंगती आढळल्यास, तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
तुम्हीही तथ्य तपासणी करू शकता
तुम्हाला कोणत्याही व्हायरल मेसेजची सत्यता तपासायची असेल, तर तुम्हाला पीआयबी त्या बातमीची सत्यता तपासण्याची सुविधा देते. यासाठी तुम्ही फेसबुक https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसेच, तुम्ही pibfactcheck@gmail.com वर ईमेल करून किंवा 8799711259 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करून माहितीची सत्यता तपासू शकता.