टाटांचे देशाला मोठे गिफ्ट! नवीन संसद भवन १ रुपयांत बांधून दिले; व्हायरल मेसेजचे सत्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 02:07 PM2023-04-15T14:07:10+5:302023-04-15T14:09:10+5:30
Fact Check About New Parliament And Tata Group: नवे संसद भवन. दोन नवे विक्रम. ही वास्तू केवळ १७ महिन्यांत उभारण्यात आली आहे. टाटांनी त्यासाठी केवळ १ रुपया घेतला, असे मेसेज व्हायरल होत आहेत.
Fact Check About New Parliament And Tata Group: राजधानी दिल्लीमध्ये सेंट्र्ल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक या प्रकल्पाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी सुमारे तासभर नव्या संसदेच्या आवारात पाहणी करत होते. या प्रकल्प उभारणीत टाटा समूह सहभागी आहे. टाटांच्या दानशूरपणाच्या गोष्टी कायम चर्चेत असतात. याचबाबत आता सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यात टाटा यांनी नवीन संसद भवन देशाला बांधून देण्यासाठी केवळ १ रुपया घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरेच असे आहे का? या व्हायरल मेसेजमागील तथ्य जाणून घ्या....
देशाच्या जडणघडणीत टाटा समूहाचे योगदान अतिशय मोठे आहे. सध्या दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची चर्चा आहे. संसदेची नवी दिमाखदार वास्तू उभारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच नव्या वास्तूची पाहणी केली. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमधील संसदेची नवी वास्तू टाटा समूहाने अवघ्या एका रुपयात आणि १७ महिन्यांच्या रेकॉर्डब्रेक कालावधीत उभारली, असा दावा पोस्टमधून करण्यात आला आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टमध्ये हा दावा केला आहे. ट्विटरवर तर अशा आशयाची असंख्य ट्विट्स पाहायला मिळत आहेत.
१७ महिन्यांत नवीन संसदेचे काम आणि १ रुपया मानधन
नवे संसद भवन. दोन नवे विक्रम. ही वास्तू केवळ १७ महिन्यांत उभारण्यात आली आहे. टाटांनी या वास्तूची उभारणी केली आहे आणि त्यासाठी केवळ १ रुपया घेतला आहे. हे टाटाचं देशासाठी गिफ्ट आहे, असा दावा करणारी अनेक ट्विट्स अनेकांनी केली आहेत. नव्या संसद भवनाची उभारणी टाटा समूहाने केली हा दावा १०० टक्के खरा आहे. ते वास्तव आहे. मात्र १७ महिन्यात वास्तूची उभारणी झाली आणि त्यासाठी टाटा समूहाने केवळ १ रुपया घेतला हे दोन्ही दावे पूर्णपणे खोटे आहेत.
मग नेमके सत्य काय?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी सरकारने निविदा मागवल्या. टाटा समूहाने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत बोली जिंकली. नव्या संसद भवनाच्या उभारणीच्या कामासाठी टाटा समूहाने ८६१ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे १ रुपयात टाटा समूहाने नव्या संसद भवनाची उभारणी केली हा दावा खोटा आहे.
दरम्यान, पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या संसद भवनाच्या कामासाठी लागलेला कालावधी १७ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. त्यामुळे संसद भवनाच्या नव्या वस्तूचे काम केळ १७ महिन्यांत पूर्ण झाले, या दाव्यात तथ्य नाही. १७ महिन्यांत वास्तू उभी राहिली आणि त्यासाठी टाटा समूहाने केवळ १ रुपय घेतला हे दोन्ही दावे खोटे आहेत. त्यात तथ्य नाही.
@RNTata2000
New Parliament House
Two new records
It was built in merely 17 months
TATA bulit it and only 1 rupee as a cost to the govt.
This is TATA ‘s gift to nation.
SALUTED SIR
YOUR TEAM AND ENTAIRE TATA GROUP
SARFARAZ FROM SRK SURAT PA TO CHAIRMAN pic.twitter.com/Ommn2zzeBO— SarfaraZ A Naviwala (@naviwalasa) April 6, 2023
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"