आयपीएलमुळे फॅक्टरी कामागाराचा मुलगा नाथू करोडपती
By admin | Published: February 7, 2016 02:40 PM2016-02-07T14:40:42+5:302016-02-07T14:40:42+5:30
आयपीएल स्पर्धेसाठी शनिवारी झालेल्या लिलावात राजस्थानातील फॅक्टरी कामागाराचा मुलगा असलेल्या नाथू सिंहला तब्बल तीन कोटी २० लाख रुपयांचा भाव मिळाला.
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ७ - इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आतापर्यंत बरीच टीका झाली असली तरी, या स्पर्धेने अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिल्याचे नाकारता येणार नाही. आयपीएलमध्ये पैशांचा जो वापर होतो त्यावर टीका होत असली तरी, या स्पर्धेने अनेक गरजू क्रिकेटपटूंना 'अच्छे दिन'ही दाखवले आहेत. अशाच क्रिकेटपटूंपैकी एक आहे नाथू सिंह.
आयपीएल स्पर्धेसाठी शनिवारी झालेल्या लिलावात राजस्थानातील फॅक्टरी कामागाराचा मुलगा असलेल्या नाथू सिंहला तब्बल तीन कोटी २० लाख रुपयांचा भाव मिळाला. नाथूला इतक्या रक्कमेला आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले आहे.
वेगवान गोलंदाजीचा नाथूमध्ये असलेला स्पार्क सर्वप्रथम राहुल द्रविडने हेरला. त्यानंतर नाथूची प्रगती सुरु झाली. घरची परिस्थिती बेताची असलेल्या नाथूने प्रचंड मेहनतीने, कष्टाने इथवरचा टप्पा गाठला आहे. तो रहात असलेल्या मुरलीपुराच्या गल्लीमध्ये नाथूने टेनिस बॉलने गोलंदाजीला सुरुवात केली होती.
आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आपली क्षमता सिद्ध करायची. भारतीय संघात प्रवेश मिळवण्याचे आयपीएल एक व्यासपीठ आहे असे नाथूने सांगितले. २०१५-१६ मध्ये रणजी करंडक स्पर्धे दरम्यान राजस्थानचा आघाडीचा गोलंदाज पंकज सिंह जायबंदी झाल्यानंतर नाथूला संधी मिळाली. तिथून नाथूचा प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी इतकी प्रचंड रक्कम मिळाल्यानंतर आई-वडिल आणि भावासाठी मोठे घर बांधण्याची इच्छा नाथूने व्यक्त केली आहे.