"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 09:44 AM2024-06-17T09:44:42+5:302024-06-17T09:52:50+5:30

BJP Faggan Singh Kulaste : मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

faggan singh kulaste reaction on not getting minister post in pm modi cabinet | "मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा

"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा

मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "मी चौथ्यांदा ज्युनिअर मंत्री होण्यास स्पष्ट नकार दिला होता. मी तीन वेळा राज्यमंत्री झालो आहे. चौथ्यांदा राज्यमंत्री होणं चांगलं वाटले नाही. म्हणून मी स्पष्ट नकार दिला. मी कॅबिनेट मंत्री झालो तर चांगलं होईल, असं मी म्हणालो. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही" असं फग्गन सिंह कुलस्ते यांनी म्हटलं आहे. 

मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजयी झालेले भाजपाचे ६५ वर्षीय नेते फग्गन सिंह कुलस्ते यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. कुलस्ते मंडला भागातील मतदारांचे आभार मानण्यासाठी आले होते.

फग्गन सिंह कुलस्ते हे मागील सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्री होते. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री होते. यापूर्वी, १९९९ ते २००४ दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, फग्गन सिंह कुलस्ते यांनी आदिवासी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

२०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांनीही नशीब आजमावलं होतं. मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. कुलस्ते यांच्यासह तीन खासदारांचा समावेश असलेल्या कथित कॅश फॉर व्होट घोटाळ्याशी त्यांचं नाव एकदा जोडलं गेलं होतं. जुलै 2008 मध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत चलनी नोटा दाखवल्या होत्या.

मंडला लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना खासदार फग्गन सिंह कुलस्ते हे जिल्हा रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी तेथे दाखल झालेल्या रुग्णांचीही विचारपूस केली. तसेच तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. 

Web Title: faggan singh kulaste reaction on not getting minister post in pm modi cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.