गुरदासपूरमधील हल्ला हे गुप्तचर यंत्रणेचे अपयशच - काँग्रेस
By admin | Published: July 27, 2015 04:25 PM2015-07-27T16:25:39+5:302015-07-27T16:26:44+5:30
पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील दहशतवादी हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक असून या हल्ल्यातून गुप्तचर यंत्रणांचे अपयश दिसून येते अशा शब्दात काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर देशाच्या सीमा रेषा सील करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी मित्रपक्ष भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
सोमवारी पंजाबमधील गुरदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला असून अद्याप चकमक सुरु आहे. या हल्ल्यावरुन आता राजकारण सुरु झाले असून काँग्रेसने हल्ल्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुरदासपूर येथे हल्ला करणारे दहशतवादी हे सीमा ओलांडून भारतात आल्याचे समजते, मग हे सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी उपस्थित केला. भारताला यावर चोख प्रत्युत्तर द्यावे, जेणेकरुन असे हल्ले करणा-यांची हिंमत कमी होईल. पंतप्रधानांनी यावर कठोर उपाययोजना राबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंजाबमधील हल्ला हे केंद्र सरकारचे अपयश आहे,सरकार जबाबदारीपासून पळू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटरव्दारे दिली आहे. एकीकडे विरोधकांककडून सरकारवर टीका होत असतानाच एनडीएतील घटकपक्ष अकाली दलाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली. देशाच्या सीमा सील करणे हे सरकारचे काम आहे, घुसखोरी रोखण्यात सीमा सुरक्षा दलाला अपयश का आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.