बिहारमध्ये महाआघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांची आरजेडी, काँग्रेसवर टीका, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:49 IST2023-11-02T15:49:12+5:302023-11-02T15:49:32+5:30
Nitish Kumar: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या महाआघाडीतील घटकपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.

बिहारमध्ये महाआघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांची आरजेडी, काँग्रेसवर टीका, तर्कवितर्कांना उधाण
बिहारमधील सत्ताधारी असलेल्या महाआघाडीतील घटकपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिक्षक भरती कार्यक्रमामध्ये सांगितले की, कुणीतरी पोस्टर प्रसिद्ध करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तर कधी कुठलं काम केलेलं नाही आहे. तर आम्ही संपूर्ण राज्यासाठी काम करतो. जे चाललंय ते योग्य नाही आहे. हे सर्व थांबवा, असा सल्ला दिला आहे.
यापूर्वी नितीश कुमार यांनी मंत्र्यांकडून राज्यातील आघाडी सरकारने केलेल्या कार्याचा वापर आपापल्या पक्षांची प्रतिमा चमकवण्यासाठी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बिहार स्टेट पॉवर कंपनी लिमिटेडच्या ११ व्या वर्धापन दिना दिवशी आयोजित कार्यक्रमामध्ये नितीश कुमार यांनी हे विधान केलं होतं.
सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांबाबत नितीश कुमार कुणाचंही नाव न घेता म्हणाले की, माझ्या सरकारमधील अनेक मंत्री केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरकारच्या चांगल्या कामांचं श्रेय आपल्याच पक्षांना देत आहेत. हे योग्य नाही आहे. जेव्हा मी बिहारमधील कुठल्याही चांगल्या कामाचा उल्लेख करतो तेव्हा मी माझं वैयक्तिक यश म्हणून त्याचा उल्लेख करत नाही.
नितीश कुमार यांनी सांगितले की, सर्व मंत्र्यांनी एखाद्या चांगल्या कामाचं श्रेय हे संपूर्ण सरकारला दिलं पाहिजे. केवळ स्वत:च्या पक्षाला देता कामा नये. यावेळी नितीश कुमार यांनी बिजेंद्र यादव यांच्या कामाचंही कौतुक केलं.
नितीश कुमार यांनी २०२० मध्ये विधानसभा निवडणूक भाजपाला सोबत घेऊन जिंकली होती. मात्र गतवर्षी ते भाजपाची साथ सोडून पुन्हा महाआघाडीमध्ये गेले होते. पण तेव्हापासूनच महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत.