फैजाबादचं नाव होणार अयोध्या, योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 07:32 PM2018-11-06T19:32:23+5:302018-11-06T19:34:10+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.
लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज ठेवल्यानंतर आता फैजाबादचं नाव बदलून अयोध्या होणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तीर्थनगरमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्या आमचा आन, बान आणि शानचं प्रतीक आहे. कोणीही अयोध्येबरोबर अन्याय करू शकत नाही. अयोध्येची ओळख भगवान रामानं होते.
आदित्यनाथ यांनी दीपावलीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या दीपोत्सवमध्ये हे विधान केलं आहे. जिल्ह्यात भगवान रामाचे वडील राजा दशरथ यांच्या नावानं मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. अयोध्येबरोबर कोणीही अन्याय करू शकत नाही. पहिले मुख्यमंत्री अयोध्येला येत नव्हते. मी आतापर्यंत 6 वेळा अयोध्येला आलो आहे. रामाच्या पवित्र धरतीवर जाती आणि धर्मामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. आज पूर्ण देश आणि उत्तर प्रदेश जाणतो की, अयोध्येला काय पाहिजे आहे. त्यामुळेच आता फैजाबादचं नामकरण अयोध्या करण्यात आलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं योगी आदित्यनाथ यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे.
या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात दक्षिण कोरियाची पहिली महिला किम जोंग सुकही सहभागी होत्या. इलाहाबादचं नाव प्रयागराज केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिहारचे राज्यपाल आणि भाजपा नेते लालजी टंडन यांनी आता लखनऊचंही नामकरणं व्हावं, अशी मागणी केली आहे. लालजी टंडन यांच्या मते लखनऊचं नाव बदलून लक्ष्मणपूर केलं पाहिजे.