विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:12 PM2024-10-21T16:12:31+5:302024-10-21T16:16:38+5:30

विमानांमधील बॉम्बच्या धमक्यांच्या बाबतीत केंद्र सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे.

Fake calls about bombs in planes will be made a cognizable offence law will be brought soon Civil Aviation Minister reaction | विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला प्लॅन

विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला प्लॅन

Action Against Threatening Calls : गेल्या आठवडाभरात विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या ७० हून अधिक धमक्या आल्या आहेत. या खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  या धमक्यांबाबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आरएस भाटी आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या बैठकीदरम्यान, गृह मंत्रालयाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधील खोट्या माहितीबद्दल माहिती देण्यात आली. आता केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणांवर कठोर भूमिका घेतली आहे. फसवी माहिती देणाऱ्या लोकांवर दंड आकारण्यासह कठोर कारवाई करण्याच्या तयारीत सरकार आहे.

देशभरातील विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येण्याची प्रक्रिया गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. रविवारीही ३० विमानांना बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारने या सगळ्या प्रकाराबाबत कठोर पावलं उलली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालय विमान सुरक्षा नियम आणि नागरी उड्डाण सुरक्षा कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. या दोन्ही कायद्यांमध्ये सुधारणा केल्यानंतर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला असे फसवे फोन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिक अधिकार असतील. त्यांना विमानाने प्रवासही करता येणार नाही. 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान कंपन्यांना फसवे कॉल करणे आता दखलपात्र गुन्हा म्हणून वर्गीकृत केले जाईल, असं म्हटलं. विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे अनेक विमान कंपन्यांना काही दिवसांपासून असे खोटे फोन आल्यानंतर हे पाऊल उचलले जात आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी हे अत्यंत संवेदनशील परिस्थिती असल्याचे सांगितले आणि म्हटलं की असे फसवे कॉल करणाऱ्यांना विमान कंपन्यांच्या नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवले जाईल. तसेच यासाठी असा कायदा करायला हवा ज्यामध्ये अफवा पसरवणाऱ्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी म्हटलं आहे.

"आता विमानामध्ये बॉम्ब किंवा हल्ल्याच्या धमक्या असलेले फसवे कॉल करणे हा दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. असे करणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात येईल. याशिवाय अशा प्रकरणांमध्ये कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद असावी. आम्ही सुरक्षा कॅमेऱ्यांची संख्याही वाढवली आहे. यामुळे विमानतळावरील देखरेख आणखी मजबूत झाली आहे. याशिवाय या प्रकरणांना कसे सामोरे जायचे याबाबतही आम्ही गृहमंत्रालयाशी बोलत आहोत. आम्हाला विमान सुरक्षा नियमांमध्ये बदल करावे लागतील आणि आम्ही हे प्रकरण गृह मंत्रालयासमोर ठेवले आहे. नव्या कायद्यात जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल," असा इशारा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिला.

"फसव्या फोन कॉल्समुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते. संपूर्ण प्रशासन त्रस्त होतं आणि प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एका आठवड्यात असे १०० फोन आले असून त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. ही संवेदनशील बाब आहे. जेव्हा आपण फसव्या कॉल्सबद्दल बोलतो तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले पाहिजे याचा देखील विचार केला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही धोक्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. यास वेळ लागतो आणि संपूर्ण प्रोटोकॉल पाळला जातो," असेही मंत्री राम मोहन नायडू म्हणाले.
 

Web Title: Fake calls about bombs in planes will be made a cognizable offence law will be brought soon Civil Aviation Minister reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.