Alert! 'या' ५ फाइल्स चुकूनही डाऊनलोड करू नका; बनावट Cowin अॅपबाबत सरकारचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:00 PM2021-05-14T18:00:59+5:302021-05-14T18:02:38+5:30
Covid Vaccine Registration : CERT-In नं सर्वांना रजिस्ट्रेशनच्या नावावर या फाईल्स डाऊनलोड न करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे डेटा सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता केली व्यक्त.
Fake Covid Vaccine Registration: सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात व्यापक प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी लसींच्या असलेल्या टंचाईमुळे लोकांना लस मिळत नाही. अनेकदा लसींच्या मर्यादित संख्येमुळे लोकांना स्लॉटही मिळत नाहीत. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही अॅप लोकांची माहिती घेत असल्याचं समोर आलं आहे. इंडियन कंम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमच्या (CERT-In) सदस्यांनी अशा बनावट अॅप्सबाबत इशारा दिला आहे. तसंच हे अॅप्स एसएमद्वारे पसरवण्यात येत असून याच्या सहाय्यानं वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.
CERT-In नं दिलेल्या माहितीनुसार एसएमएसद्वारे या बनावट अॅप्सवरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची ऑफर दिली जात आहे. प्रत्येक मेसेजचा कंटेन्ट निरनिराळा असू शकतो. तसंच अँड्रॉईड युझरला ते एपीके फाईल्सद्वारे डाऊनलोड करण्यास सांगू शकतो. एसएमएससोबत एक डाऊनलोड लिंकही पाठवली जाते. यामध्ये Covid-19.apk, Vccin-Apply.apk, Cov-Regis.apk, Vaci__Regis.apk, आणि MyVaccin_v2.apk चा समावेश आहे.
इन्स्टॉल केल्यास मित्रांनाही मेसेज
ज्या लोकांनी हे एपीके डाऊनलोड केले आहेत त्यांच्या मित्रांनाही एसएमएस जात असल्याचं CERT-In नं म्हटलं आहे. नियमाकानं युझर्सना या अॅपच्या अप्रुव्हल न देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसंच हे अॅप युझरच्या पासवर्डसहित व्यक्तिगत माहितीही चोरली जाऊ शकते. CERT-In नं अशा बनावट डोमेन, ईमेल्स आणि मेसेजेस आणि फोन कॉलपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी केवळ cowin.gov.in ही अधिकृत वेबसाईट असल्याचंही सांगण्यात आलं आहे.