गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये इम्प्रेस करण्यासाठी 'तो' झाला DSP; अशी झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 02:51 PM2024-07-25T14:51:09+5:302024-07-25T14:59:49+5:30
एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करणं चांगलंच महागात पडलं आहे.
एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करणं चांगलंच महागात पडलं आहे. डीएसपी असल्याचं दाखवून तो खोटी छाप पाडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचं खोटं आता अशा प्रकारे उघड झालं की, केवळ त्याची गर्लफ्रेंडच नाही तर संपूर्ण जगाला तो डीएसपी नसल्याचं समजलं. फिल्मी स्टाईलमध्ये इम्प्रेस करण्याच्या नादात तो जेलमध्ये पोहोचला आहे.
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका तरुणाला डेप्युटी एसपीच्या गणवेशासह अटक करण्यात आली आहे. झुंझुनू शहरातील रोडवेज बस स्टँडजवळील पार्कमध्ये एक तरुण बसला होता. पोलिसांनी संशयित तरुणाच्या सामानाची आणि बाईकची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत गणवेश आढळून आला, जे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या संदर्भात पोलिसांनी आरोपी तरुणाकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
या घटनेची माहिती देताना कोतवाली पोलिस स्टेशनचे एएसआय मुलायम सिंह यांनी सांगितलं की, पकडलेल्या तरुणाचं नाव निशांत असं असून तो गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये इम्प्रेस करण्यासाठी डीएसपीचा गणवेश घालून शहरात फिरत होता. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तो आपल्या बाईकवर उद्यानाजवळ उभं राहून कोणाची तरी वाट पाहत होता.
बाईकला लावलेला स्टीकर पाहून कोणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पेट्रोलिंग हेड कॉन्स्टेबल धर्मपाल घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच तरुण पळू लागला मात्र तो पकडला गेला. चौकशीत त्याने सांगितलं की मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी हे केलं. नियम माहीत नसल्याने तो पकडला गेला. त्याने काळे शूज घातले होते. मात्र अधिकारी स्तरावर असल्यास शूज वेगळ्या रंगाचे असतात. त्यामुळेच पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्याची पोलखोल झाली आहे.