भारतीयांच्या डाटा चोरीसाठी बनावट आरोग्य सेतू अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:49 AM2020-06-10T05:49:36+5:302020-06-10T05:50:07+5:30
कोरोना वायरसबाबत अलर्ट करण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचे निर्देश दिले.
मुंबई : एकीकडे तीन कोटी भारतीयांचा तपशील डार्कनेटवर विक्रीसाठी उपलब्ध असताना, भारतीयांच्या डाटा चोरीसाठी पाकिस्तानी हॅकर्सकडून बनावट आरोग्य सेतू अॅप बनविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या मार्फत ते भारतीयांपर्यंत पोहोचवले जात आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोरोना वायरसबाबत अलर्ट करण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. अशातच, नागरिकांचा वाढता कल लक्षात घेता, पाकिस्तानी हॅकर्सने आरोग्य सेतू अॅप सारखे बनावट अॅप तयार केले आहे. आणि व्हॉटसअॅपच्या मार्फत ते भारतीयांपर्यंत पोहोचवले जात आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हॅकर्सने एप्रिल २०२० मध्ये पहिले बनावट अॅप तयार केले. अनेक भारतीयांनी ते डाऊनलोडही केले होते. त्यानंतर ते अपडेट करत त्यांनी हुबेहूब असे अॅप तयार केले आहे. दोघांमध्ये साधर्म्य असल्याने नागरिकांची यात फसवणूक होत आहे. आपल्या मूळ अॅपमध्ये फाइल एक्सटेंशन ॅङ्म५.्रल्ल असे आहे. बनावट अॅपमध्ये .अस्र‘ असे नमूद आहे.
आमिषांना बळी पडू नका
सध्या समाजमाध्यमांवरून विविध आमिषे दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात या सेवा मिळवण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्यामुळे अशा आमीषांना बळी पडू नका, असे आवाहन सायबर विभागाने केले.