ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 09:27 AM2018-09-19T09:27:09+5:302018-09-19T09:30:01+5:30

मुलाखतीसाठी त्या दिवशी एखादा अधिकारी गैरहजर असल्यास त्याचे कार्यालय उपलब्ध करुन द्यायचे

Fake Interviews for ONGC at Krishi Bhawan in Delhi | ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती

ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती

Next

नवी दिल्ली : ओएनजीसीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने हजारो उमेदवारांना लुटणाऱ्या टोळीची दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीतील कडोकोट बंदोबस्त असलेल्या कृषी भवनमध्ये या टोळीकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. या भामट्यांनी तरुणांकडून करोडो रुपये हडपले असल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याबरोबर मिळून हो गोरखधंदा सुरु होता.


मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांमुळे या टोळीने खरोखरच भरती सुरु असल्याचे भासवण्यासाठी या कार्यालयाचा वापर सुरु केला होता. यासाठी त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दोन बहुद्देशिय कर्मचाऱ्यांशी सलगी केली होती. या टोळीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, ऑनलाईन स्कॉलरशिप संस्थेचा संचालक, ग्राफिक डिझायनर आणि अन्या दोघे असे उच्चशिक्षित लोक होते. मंत्रालयातील दोन्ही कर्मचारी मुलाखतीसाठी त्या दिवशी एखादा अधिकारी गैरहजर असल्यास त्याचे कार्यालय उपलब्ध करुन द्यायचे. यानंतर तरुणांना मुलाखतीसाठी बोलवले जायचे. 


मुलाखत घेताना आरोपी स्वत:ला ओएनजीसीचे समिती सदस्य असल्याचे सांगायचे. मुलाखतीनंतर या तरुणांना बनावट जॉब लेटर दिले जायचे. यानंतर या टोळीचा प्रमुख त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. 


काही दिवसांपूर्वीच या लोकांनी काही तरुणांकडून 22 लाख रुपये उकळले होते. हे तरुण ओएनजीसीकडे विचारण्यास गेले असता हा प्रकार उघड झाला. ओएनजीसीने या प्रकरणी वसंत कुंज पोलीसांत तक्रार दाखल केली. यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासामध्ये असे आढळले की, ओएनजीसीच्या अधिकृत इमेल वरून या तरुणांना मुलाखतीसाठी मेल करण्यात आले होते. तसेच यामध्ये कृषी भवनामध्ये मुलाखत प्रक्रिया होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. 


आरोपींकडून 27 मोबाईल, 2 लॅपटॉप, 10 चेकबूक, 45 सिम कार्ड आणि बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त राजीव रंजन यांनी सांगितले. सर्व आरोपी 25 ते 35 वयोगटातील आहेत. तर मंत्रालयातील एक कर्मचारी पुढील वर्षभरात निवृत्त होणार होता. 

Web Title: Fake Interviews for ONGC at Krishi Bhawan in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.