लोकसभा निवडणुकीपूर्वी बनावट सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते, आरजेडी नेत्याचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:04 PM2024-01-11T16:04:42+5:302024-01-11T16:06:21+5:30
निवडणुकीआधी भाजपा काही मोठी घटना घडवू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे आलोक मेहता म्हणाले.
आरजेडी नेते आणि बिहार सरकारचे महसूल आणि ऊस मंत्री आलोक मेहता यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार बनावट सर्जिकल स्ट्राईक करू शकते, असे दावा आलोक मेहता यांनी केला आहे. गुरुवारी राज्यातील बेतिया येथील आरजेडीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात आलोक मेहता बोलत होते. यावेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने 47 लष्करी जवानांचे बलिदान दिले आणि बनावट सर्जिकल स्ट्राईक केले. यावेळच्या निवडणुकीआधी भाजपा काही मोठी घटना घडवू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे आलोक मेहता म्हणाले.
गुजरात 2002 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना माहित होते की, ते वाईटरित्या हरणार आहेत, म्हणून त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी दंगली घडवून आणल्या. निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात, असा त्यांचा इतिहास आहे, असेही आलोक मेहता यांनी सांगितले. कार्यक्रमाला संबोधित करताना आलोक मेहता म्हणाले की, देशातील सर्व सरकारी संस्था ज्या प्रकारे खासगी कंपन्यांना विकल्या जात आहेत, याचा अर्थ देशातील आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हा देश नागपूरच्या कायद्याने नव्हे तर बाबासाहेबांच्या राज्यघटनेने चालेल. देशात नागपूर कायदा लागू होऊ देणार नाही.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनावरूनही आलोक मेहता यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाला मंदिर-मठ काबीज करायचे आहेत. आपण सर्व प्रभू रामावर विश्वास ठेवतो. राम आणि कृष्ण हा आपला आध्यात्मिक वारसा आहे, असे आलोक मेहता म्हणाले. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. राम मंदिर ट्रस्टने या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पक्षप्रमुख आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले आहे. मात्र, या सोहळ्याला आरजेडी नेते उपस्थित नाहीत. इतकेच नाही तर काँग्रेससह इंडिया आघाडीतील बहुतांश घटक पक्ष रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहत नाहीत.