मुंबई लोकलमधील सुपरहिट 'लुडो किंग' होणार राष्ट्रीय खेळ, पंतप्रधान मोदीही भारावले!
By अमेय गोगटे | Published: February 21, 2018 01:54 PM2018-02-21T13:54:00+5:302018-02-21T14:24:42+5:30
मुंबईतील लोकल प्रवासाचा अविभाज्य भाग झालेल्या लुडो या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने थेट पीएमओ स्तरावर हालचाली सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
मुंबईतील लोकल प्रवासाचा अविभाज्य भाग झालेल्या लुडो या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने थेट पीएमओ स्तरावर हालचाली सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. या खेळाची ताकद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झालेत की, 'भारत जोडो' अभियानासाठी लुडोचा वापर करण्याचा विचार ते करत आहेत, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
त्याचं झालं असं की, नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी रविवारी मुंबईत आले होते. कार्यक्रमाला गर्दी चांगली होती, पण बरेच जण डोकी खाली घालून मोबाइलवर काहीतरी करत बसले होते. एकाच मोबाइलवर चार जण काय करताहेत, हे मोदींना कळेना. इतर सभांमध्ये त्यांचे फोटो काढण्यासाठी, खुर्चीवर वळून-वळून सेल्फी घेण्यासाठी समोरची मंडळी धडपडत असतात. मग इथल्या लोकांना झालंय काय, असा प्रश्न त्यांना पडला. परतीच्या प्रवासात त्यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सगळं प्रकरण उलगडून सांगितलं.
गुगल प्ले स्टोअरवरील लुडोनं मुंबईकरांना 'याड' लावलं आहे. हा खेळ लोकल प्रवासातील हक्काचा विरंगुळा होऊन गेलाय आणि त्यामुळे भांडणंही खूप कमी झाली आहेत, अशी 'महती' रेल्वेमंत्र्यांनी सांगितली. एका पीएनं तो गेम लगेचच डाउनलोड करून मोदींना दाखवला. मोदींनीही हा खेळ लहानपणी सापशिडीच्या मागे पाहिला होता. पण, स्मार्टफोनच्या काळात तो इतका प्रसिद्ध झाल्याची त्यांना कल्पना नव्हती. स्वभावाप्रमाणे, मोदी या विषयाच्या खोलात गेले आणि त्यांना 'लुडो'ची खरी क्षमता लक्षात आली.
जात, पात, धर्म, पंथ, प्रादेशिक मतभेद विसरून, अगदी समरस होऊन मुंबईकर प्रवासी हा खेळ खेळत असल्याची उदाहरणं मोदींच्या रिसर्च टीमने त्यांना दिली. 'हा खेळ प्रत्यक्ष चार जणच खेळतात, पण आजूबाजूचे चार जण त्यात रमून जातात, दोघे जण तर कुठली सोंगटी पुढे न्यायची याबाबत चारही खेळाडूंना निःपक्षपातीपणे मार्गदर्शन करतात. एखाद्या ग्रूपमध्ये तीनच जण असतील, तर त्यांनी विचारायची खोटी की चौथा अनोळखी प्रवासीही त्यांच्यासोबत खेळू लागतो आणि त्यांची चांगलीच गट्टीही जमते', असा सविस्तर अहवालच त्यांनी सोपवला. तो पाहून मोदींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकला. सर्व जाती-धर्मांना एकत्र आणणारा हा लुडो खेळ भारत जोडोसाठी सगळ्यात प्रभावी माध्यम ठरू शकतो, याची खात्रीच त्यांना पटली. त्यामुळे, लुडो हा राष्ट्रीय खेळ होणार, हे जवळपास निश्चितच आहे.
सध्या हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. परंतु, त्यातील प्रत्येक खेळाडूच्या हातात स्टिक असल्याने देशाची चुकीची प्रतिमा जगात जात असल्याचं काही गटांचं म्हणणं आहे. तसंच, त्यात पंजाबला झुकतं माप मिळत असल्यानं प्रादेशिक असमतोलाच्या मुद्द्यानंही डोकं वर काढलंय. २०१९च्या पार्श्वभूमीवर, हे विषय डोकेदुखी ठरू नयेत, म्हणून सगळ्यांना लुडोच्या चौकडीत अडकवण्यासाठी केंद्र सरकार फासा टाकणार आहे.
(ही बातमी 'टेक इट इझी' किंवा 'दिल पे मत ले यार' कॅटेगरीतील आहे. ब्रेकिंग न्यूज नसून 'फेकिंग न्यूज' आहे. थोडीशी गंमत म्हणूनच त्याकडे बघा, फार मनावर घेऊ नका. कुठल्याही व्यक्तीचा किंवा खेळाचा अपमान करण्याचा आमचा हेतू नाही.)