Falgu River: सीतेच्या शापातून मुक्त होणार फल्गू नदी, पाहा काय होता सीतामाईंचा शाप?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 06:23 AM2022-04-10T06:23:57+5:302022-04-10T06:25:14+5:30
Falgu River: पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.
- विभाष झा
पाटणा : पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.
कोरड्या फल्गू नदीमध्ये पाणी राहावे, यासाठी रबर डॅमचे निर्माणकार्य वेगाने करण्यात येत आहे. मोकामाहून पाईपलाईनद्वारे गंगा नदीचे पाणी गयेपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. रबर डॅम लवकरच तयार होईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर गंगा नदीच्या पाण्याने फल्गू नदी खळखळू शकते. यामुळे फल्गू नदीत वर्षभर पाणी राहून येथे पिंडदानासाठी येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळेल.
सध्या फल्गू नदीमध्ये पाणी नसल्यामुळे पिंडदानाला येणाऱ्या भाविकांना नदीच्या वाळूमध्ये दीड ते दोन फूट खोदकाम केल्यावरच पाणी मिळते. लोक येथे खोदकाम करून पाण्याने तर्पण करतात. गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम यांनी सांगितले की, फल्गू नदीवर रबर डॅम उभारण्याचे काम वेगाने केले जात आहे.
काय होता शाप?
पौराणिक कथेनुसार, राजा दशरथाचे पिंडदान फल्गू नदीच्या तीरावर सीता मातेने वटवृक्ष, गाय, तुळस, फल्गू नदी व ब्राह्मण यांना साक्षी मानून केले होते. त्यावेळी भगवान राम व लक्ष्मण पिंडदानाचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. ते परतल्यावर सीतामातेने त्यांना पिंडदानाबाबत सांगितले. त्यानंतर सीतेने ज्यांना साक्षी मानले होते, त्या सर्वांना बोलावले. परंतु वटवृक्ष सोडून कोणीही खरे सांगितले नाही. यामुळे नाराज झालेल्या सीतामातेने इतरांना शाप दिला व वटवृक्षाला वरदान देऊन सांगितले की, कुणाचेही पिंडदान तुझ्या पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही.