मोदींच्या ताफ्याच्या मार्गावर फेकली फुलदाणी
By admin | Published: February 4, 2016 03:09 AM2016-02-04T03:09:09+5:302016-02-04T03:09:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा ताफा नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळून जाण्यास काही क्षण असताना एका २० वर्षीय महिलेने सुरक्षा भेदत या मार्गावर फुलदाणी फेकून मारल्याची घटना बुधवारी घडली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा ताफा नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळून जाण्यास काही क्षण असताना एका २० वर्षीय महिलेने सुरक्षा भेदत या मार्गावर फुलदाणी फेकून मारल्याची घटना बुधवारी घडली. नीना रावल असे या महिलेचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील साहिबाबादची रहिवासी आहे.
पंतप्रधानांचा ताफा जाणार असल्याने पोलिसांनी या मार्गावर आधीच मोर्चा सांभाळला होता. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. यादरम्यान ही महिला समोर आली. तेव्हा तिची पोलिसांशी बाचाबाचीही झाली. पोलीस उपायुक्त जतीन नरवाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांचा ताफा जाणार होता म्हणून विजय चौकनजीक नागरिकांना थांबवून घेण्यात आले होते. या नागरिकांतच ही महिला उभी होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींच्या गाड्यांचा ताफा येण्याच्या काही सेकंदापूर्वी तिने बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला रोखताच, तिने रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी असलेली फुलदाणी उचलली आणि गाड्यांच्या ताफ्याच्या दिशेने फेकून मारली. सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये यामुळे एकच गोंधळ उडाला. सदर महिलेला तात्काळ घटनास्थळापासून दूर नेण्यात आले. यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्यात तिला ताब्यात घेण्यात आले. पोलीस तिची कसून चौकशी करीत आहेत.