बलात्काराचा खोटा आरोप शिक्षेस पात्र
By admin | Published: November 18, 2014 11:54 PM2014-11-18T23:54:16+5:302014-11-18T23:54:16+5:30
व्यक्तिगत स्वार्थासाठी बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या महिलांवर खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
नवी दिल्ली : व्यक्तिगत स्वार्थासाठी बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या महिलांवर खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,असा निर्वाळा दिल्लीतील एका न्यायालयाने दिला. अशा प्रकरणात संशयित आरोपीला अत्यंत अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि निर्दोष सुटका झाल्यानंतरही त्याचा हा मनस्ताप कमी होत नाही, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेंद्र भट यांनी दिल्लीतील दोन युवकांना बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त करतानाच बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेविरुद्ध मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्याचे आदेश न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिले.
महिलांविरुद्ध वाढते अत्याचार लक्षात घेऊन या संदर्भातील कायदा अधिक कठोर करण्यात आला आहे; परंतु याचा गैरफायदा घेण्याची मनोवृत्ती महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी अशा महिलांवर खटला भरून त्यांना कठोर शिक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ज्या प्रकरणात न्यायालयाने ही कठोर भूमिका घेतली त्यात एका महिलेने द्वारका दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये दोन युवकांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. या युवकांनी शीतपेयात व्होडका पाजून आपल्यावर बलात्कार केल्याची तिची तक्रार होती; परंतु सुनावणीदरम्यान तिने आपले बयाण बदलले आणि आरोपींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले नसल्याची कबुली दिली. तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी द्वारका पोलीस स्टेशनच्या प्रभारींना पत्र पाठवून आपण चुकीची तक्रार केल्याचे तिने मान्य केले. अधिक मद्यप्राशनाने आपण नशेत होतो आणि अशा स्थितीत या युवकांनी आपल्याला घरी पोहोचवून देण्यास नकार दिल्याने धडा शिकविण्यासाठी त्यांच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला, असेही तिने सांगितले. तिच्या कबुलीनंतर न्यायालयाने दोन्ही युवकांना निर्दोष मुक्त केले.