आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:05 AM2024-05-01T09:05:43+5:302024-05-01T09:07:04+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आसाममध्ये आले आहेत. त्यांनी सांगितले की, आसाममध्ये आम्ही लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकण्याची शक्यता आहे.
गुवाहाटी : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भाजप राज्यघटना बदलणार तसेच आरक्षण संपुष्टात आणणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भाजपने ४०० हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आसाममध्ये आले आहेत. त्यांनी सांगितले की, आसाममध्ये आम्ही लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा जनाधार कमी झाला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देणे भाजपला मान्य नाही. समान नागरी कायद्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी करावी, असे भाजपचे मत आहे. देशातील सर्व धर्मासाठी एकच कायदा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. शाह म्हणाले की, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित कायदे असणे ही गोष्ट राज्यघटनेच्या विरोधातील आहे. काँग्रेस केंद्रात सत्तेवर आली तर मुस्लिम वैयक्तिक कायदा पुन्हा लागू करू, असे आश्वासन त्या पक्षाच्या जाहिरनाम्यात देण्यात आले आहे. त्याचा भाजप निषेध करतो. लोकांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून सर्व त-हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच माझ्या बनावट व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्यात आला. (वृत्तसंस्था)
सुरत, इंदूरमुळे भाजपवर लोकांचे अपार प्रेम दिसते
• सुरत आणि इंदूरमधील निवडणुकीच्या घडामोडींचा हवाला देत संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, या घटनांमधून भाजपवर लोकांचे अपार प्रेम दिसून येते.
खंडवा मतदारसंघाचे भाजपचे • उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ मांधाता येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, यावेळी लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडला. सुरतमधील भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला.
इंदूरमधील काँग्रेसच्या उमेदवाराने • अर्ज मागे घेत भाजपला पाठिबा दिला आहे. यावरून भाजपप्रति लोकांची अपार आपुलकी दिसून येते. काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे, असे ते म्हणाले.