VIDEO - भन्नाट! सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 03:42 PM2017-11-22T15:42:52+5:302017-11-22T17:43:04+5:30

भारताच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची बुधवारी सुखोई-30एमकेआय फायटर जेट विमानातून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली.

 False! Successful test of supersonic BrahMos missile from Sukhoi fighter jet | VIDEO - भन्नाट! सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

VIDEO - भन्नाट! सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Next
ठळक मुद्देभारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे. 

नवी दिल्ली - भारताच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची बुधवारी सुखोई-30एमकेआय फायटर जेट विमानातून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. सुखोई-30एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ब्राह्मोसची सुखोईवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची शत्रू प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे.  

ब्राह्मोस हे वर्ल्डक्लास क्षेपणास्त्र आहे. भारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे. सुखोईमधून ब्राह्मोस डागल्यानंतर या क्षेपणास्त्राने बंगालच्या सागरातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे. 



 

जगातील हे एक वेगवान क्रूझ मिसाईल आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. रशियाचे एनपीओएम आणि भारताचे डीआरडीओ या दोघांनी मिळून  संयुक्तपणे ब्राह्मोसची निर्मिती केली आहे. चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता आणखी 42 सुखोई विमानेही ब्राह्मोसने सुसज्ज करण्यात येणार आहेत. 



 

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आतापर्यंत 240 सुखोई विमानांचा समावेश झाला आहे. भारताने रशियाबरोबर 272 सुखोई विमानांचा खरेदी करार केला आहे. रशियाकडून परवाना मिळाल्याने भारतात एचएएल या विमानांची निर्मिती करत आहे. गेल्या दशकात लष्कराने 290 किमी पर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राला आपल्या ताफ्यात सामील केले होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी 27 हजार 150 कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच लष्कर, नौदल, आणि हवाई दलाने या क्षेपणास्त्रांबाबत रस दाखवला आहे.   

जून 2016 मध्ये भारत 34 देशांची संघटना असलेल्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझिम या संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेवरील निर्बंध उठले आहे.  त्यामुळे सुरक्षा दले आता ब्राह्मोसच्या 450 किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची चाचणी करण्याच्या तयारीत आहेत. 

एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भारत 300 किमी मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यास सक्षम होईल. सध्यातरी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे हायपरसोनिक व्हर्जन तयार कण्याची तयारी सुरू आहे. हे क्षेपणास्त्र माक 5 (ध्वनीच्या पाच पट वेगाने) वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल.  

Web Title:  False! Successful test of supersonic BrahMos missile from Sukhoi fighter jet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.