कौटुंबिक कलह; लालूंचा आरजेडी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 11:50 AM2019-08-17T11:50:19+5:302019-08-17T11:51:11+5:30
तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच पक्षाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमात दोघेही उपस्थित नसल्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षात सुरू असलेला कलह शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आला. येथे आयोजित पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत लालू यांचे चिरंजीव आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून तेजस्वी दूर राहात असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आरजेडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत केवळ तेजस्वीच नव्हे तर लालू यांची मुलगी मीसा भारती आणि मोठा मुलगा तेजप्रताप यादव हे देखील गैरहजर होते. तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यातील वादामुळे माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी पक्षाची सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. पक्षाच्या बैठकीत त्या अध्यक्षपदी होत्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर आरजेडीमधील अनेक नेते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पक्षातील या नेत्यांना रोखण्यासाठीच शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, असंही सांगण्यात आले आहे. मात्र या बैठकीला प्रमुख नेतेच गैरहजर असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या बैठकीला विधानसभा, विधान परिषद सदस्यांसह राज्यसभेचे सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी सामील होणार होते. परंतु, राज्य विधीमंडळातील दोन्ही सभागृहाचे निम्मे सदस्यह गैरहजर होते. तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच पक्षाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमात दोघेही उपस्थित नसल्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.