भीती, अंधश्रद्धा झुगारत दिल्लीतील 'त्या' घरात राहायला आले कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:41 PM2019-12-30T17:41:41+5:302019-12-30T17:43:12+5:30
बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते.
नवी दिल्ली - सुमारे दीड वर्षापूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात एकाच कुटुंबातील 11 जणांनी रहस्यमयरीत्या आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून या घराकडे स्थानिक लोक भीतीच्या नजरेने पाहत होते. तसेच या घराबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या घराबाबत वाटणारी भीती आणि अंधश्रद्धांना झुगारत येथे एक कुटुंब वास्तव्यास आले आहे. मोहन कश्यप असे या कुटुंबातील कुटुंबप्रमुखांचे नाव असून, त्यांनी आपण भूतप्रेत, अंधविश्वास मानत नसल्याचे सांगितले. मोहन कश्यप यांनी येथे डायग्नॉस्टिक सेंटर उघडले असून, आज तेथे पूजाविधी करून कामसुद्धा सुरू केले आहे.
बुराडीमधील हे घर आणि त्याविषयी पसरलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मोहन कश्यप म्हणाले की, ''मी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. जर अशा गोष्टींवर माझा विश्वास असता तर मी येथे आलोच नसतो. मात्र आपल्याकडे कुठल्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी-गणेश यांची पूजा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे मीसुद्धा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली.''
Delhi: A family has moved in at the house in Burari, where 11 members of a family committed suicide in July, 2018. Dr Mohan Singh, who has moved in at the house says, "I have no problem with it, this house is convenient as it is near the road. I am not superstitious". (29.12.19) pic.twitter.com/jVZzAhFLlB
— ANI (@ANI) December 29, 2019
दरम्यान, येथे राहणारे कुटुंब खूप चांगले होते. त्यांच्या घरात कुठलाही वाईट आत्मा राहत नाही. त्यांचा आत्मा थेट स्वर्गात गेला आहे, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह फाशीला लटकलेले होते. तर एका वृद्धेचा मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता.
आता या घरात नव्यावे वास्तव्यास आलेले मोहन कश्यप हे घरातील तळमजल्यावर पॅथॉलॉजी लॅब बनवत आहेत. तर त्यांचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहणार आहे. दरम्यान, या घराची जबाबदारी सध्या त्या मृत कुटुंबाचे नातेवाईक घेत आहेत.
या घरात 11 कुटुंबीयांच्या झालेल्या रहस्यमयी मृत्यूसोबतच काही रहस्यमय गोष्टीही दिसून आल्या होत्या. त्यात घरातून निघालेल्या 11 पाईपांनी गुढ वाढवले होते. दरम्यान, नव्याने राहण्यास आलेल्या कुटुंबाने 11 पैकी काही पाईप बंद केले आहेत. तर काही उघडे ठेवणे आवश्य असल्याचे मोहन कश्यप यांनी सांगितले.