घरात 15 गाड्या; पण एकही नाही शौचालय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 01:08 PM2017-08-02T13:08:30+5:302017-08-02T13:36:38+5:30
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ३०० कुटुंबांचं हिंडोली हे गाव आहे . गावात ४० पक्की घरं आहेत. कुटुंबं सधन आहेत. ३० चारचाकी गाड्या आहेत. पण गावात लोकांच्या घरात शौचालय नाही
जयपूर, दि. 2- राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ३०० कुटुंबांचं हिंडोली हे गाव आहे. गावात ४० पक्की घरं आहेत. कुटुंबं सधन आहेत. ३० चारचाकी गाड्या आहेत. पण गावात लोकांच्या घरात शौचालय नाही.
घासीलाल नाथ यांच्या कुटुंबात एकुण 10 सदस्य आहेत. गावात त्यांचं मोठं घर आहे तसंच त्या घरात टाइल्स लावलेल्या आहेत. घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत पण त्या घरातील महिलांना उघड्यावर शौचास जावं लागतं, आणि तसं करायला त्या महिलांचा काहीही आक्षेप नाही. यावर घासीलाल म्हणाले, आमच्याकडे शौचालय बांधायला पैसे नाहीत पण लवकरच शौचालय बांधण्याच्या विचारात आम्ही आहोत. शौचालय बांधायला सरकारकडून पैसे मिळविण्याच्या मुद्द्यावर घासीलाल यांना विचारल्यावर ते म्हणाले,ज्यांनी आत्तापर्यंत इथे शौचालयं बांधली आहेत त्यांना अजूनही सरकारकडून पैसे मिळालेले नाहीत. या गावात फक्त 16 घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले पण शौचालय बांधण्यासाठी मिळणारी 15 हजार रूपयांची सरकारी मदत अजूनही मिळाली नाही.
पुष्कर सुवालका,चित्तर लाल सुवालका आणि नाथूजी महाराज यांनी शौचालयं बांधली पण सरकारी सहाय्यता निधी त्यांनी अजूनही मिळाली नाही. त्यासाठी आम्ही प्रमाणपत्र सादर केलं. फक्त एकदा नाही तर दोनदा प्रमाणपत्र सादर केलं. पहिल्या वेळी जेव्हा आम्ही प्रमाणपत्र घेऊन गेलो होतो तेव्हा पंचायत समितीच्या कार्यालयात प्रमाणपत्र हरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रमाणपत्र सादर केलं. गेल्या दोन वर्षापासून सरकारी सहाय्यता निधी मिळण्याची वाट पाहतो आहे.
एक शौचालय बांधायला पंचवीस ते तीस हजार रूपये इतका खर्च येतो. यासाठी सरकारकडून 15 हजार रूपये निधी दिला जातो. पण तो निधी यायला ही बराच वेळ लागत असल्याचं ग्रामस्थ धन्नानाथ योगी यांनी सांगितलं आहे. हिंडोली गावातील बाबुल योगी या व्यक्तीने त्याच्या कुटुंबियांसाठी नुकतीच एक एसयुव्ही खरेदी केली. त्याच्यांकडे आधीच 6 गाड्या आहेत पण घरात एक शौचालय नाही. घरात 10 सदस्य असून सगळे उघड्यावर शौचास जातात. या सगळ्या गाड्या कर्ज काढून घेतल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लकरच घरात शौचालय बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तेथिल बाबुलाल नाथ यांच्याकडे 15 गाड्या आहेत पण घरात शौचालय नाही.
घनश्याम योगी यांच्या घरातील द्वारिका आणि सीमा या दोघी दहावीत शिकत आहेत. आमच्या घरात लवकरच शौचालय होणार आहे, याचा आनंद आहे. उघड्यावर शौचास जायला लाज वाटायची आणि भीतीही असायची, आता तसं होणार नसल्याचं या दोघींनी सांगितलं आहे. हिंडोलीच्या सीनिअर सेकंडरी स्कूलच्या प्राध्यापकांनी त्या गावात जाऊन शौचालय बांधण्याचं त्या ग्रामस्थांना प्रोत्साहन दिलं आहे.