दीड वर्ष झाले तरी अधिकारी कामावर येईना; आय़कर विभागाने मेडिकल पथकाला पाठवताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:34 PM2022-09-23T21:34:02+5:302022-09-23T21:34:28+5:30
कोरोना काळात विमलेश यांना गंभीर आजाराने ग्रासले. यामुळे ते मेडिकल लिव्हवर होते.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या मृतदेहासोबत त्याचे कुटुंबीय गेल्या दीड वर्षांपासून राहत होते. हा अधिकारी जिवंत असल्याचे त्यांना वाटत होते. तो कोमात असल्याने त्याची ही हालत झाल्याचे त्यांना वाटत होते. मेडिकल टीम जेव्हा त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा खरे सत्य समोर आले.
आरोग्य विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. विमलेश कुमार हे अहमदाबादमध्ये आयकर विभागातील एओ पदावर कार्यरत होते. कोरोना काळात विमलेश यांना गंभीर आजाराने ग्रासले. यामुळे ते मेडिकल लिव्हवर होते. १९ एप्रिल २०२१ मध्ये त्यांना कुटुंबीयांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारावेळी २२ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने डेथ सर्टिफिकेटही दिले. मात्र, कुटुंबीयांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. ते त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथेही डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबीय विमलेश यांचा मृतदेह घरी घेऊन आले. अंत्य संस्काराची तयारी सुरु होती, तेवढ्यात विमलेश यांच्या पत्नीने विमलेश यांचे पल्स सुरु असल्याचे सांगितले, तसेच ते कोमामध्ये असल्याचे सांगितले. यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला नाही. रोज गंगाजल टाकून त्यांना जिवंत ठेवले गेले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृतदेहाची हालत खूप बिकट झाली होती. हाडांना मांस आणि त्वचा चिकटली होती.
आयकर विभागाने दीड वर्ष झाले तरी अधिकारी कामावर येईना म्हणून कानपूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. तसेच त्याचा मृत्यू झालाय का याची तपासणी करण्यास सांगितले होते. यानुसार मेडिकल पथक त्यांच्या घरी पाहणीसाठी गेले होते. मृतदेह नेण्यास नातेवाईकांनी विरोध सुरू केला. त्यामुळे पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीची मानसिक स्थिती ठीक नाही. मृतदेहामध्ये काही केमिकल टाकण्यात आले आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.